मुंबई: राज्य सरकारच्या वतीने पोलिसांची मेगा भरती सुरू आहे. यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा घेतली जात असून संबंधित जिल्ह्यातील उमेदवारांनी त्या त्या जिल्ह्यात अर्ज दाखल करून भरती प्रक्रियेत सामील व्हावे, असे आवाहन गृह विभागातर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन लाखो उमेदवारांनी मैदानी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेची तयारी केली.
एकापेक्षा अनेक जिल्ह्यांसाठी अर्ज : राज्य सरकारच्या गृह विभागातर्फे एका उमेदवाराने केवळ एकाच जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दाखल करावा, असे आवाहन केले असताना अनेक विद्यार्थ्यांनी एकापेक्षा अधिक जिल्ह्यांसाठी अर्ज केले. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये गुणवत्ता यादीत स्थान पटकावून आपल्या निवडीवर शिक्कामोर्तब करून घेतले; मात्र असे असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी मुंबई शहर भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केल्याचा दावा मुंबई शहरात भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांनी केला आहे.
ही तर प्रशासनाची चूक: पोलीस भरती प्रक्रियेत एकाच उमेदवाराकडून एकाहून अधिक अर्ज दाखल झाल्यास ते सर्व अर्ज रद्द केले जाईल, असे राज्य सरकारने आधीच जाहीर केले होते; मात्र सरकारने हे अर्ज रद्द केले नसल्याने मुंबईकरिता एकच अर्ज केलेल्या उमेदवारांना मुंबई शहर भरती प्रक्रियेत सहभागी होता आले.
'त्या' उमेदवारांमुळे अन्याय: अन्य जिल्ह्यांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी पुन्हा मुंबई शहर भरतीमध्ये भाग घेऊन या जिल्ह्यातून एकदाच भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांवर अन्याय केला आहे, अशी भावना स्थानिक उमेदवारांनी व्यक्त केली. यामुळे केवळ एका मार्काने अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊ शकले नाहीत. अशा पद्धतीने विनाकारण जागा अडवणे अयोग्य असून त्यामुळे गरजू उमेदवारांवर अन्याय झाल्याचे मुंबईतील उमेदवारांनी सांगितले. काही उमेदवारांची ही शेवटची संधी होती. गेल्या काही वर्षांपासून आपण सातत्याने भरती प्रक्रियेत सहभागी होत आहोत; मात्र शासकीय गलथानपणामुळे आपली निवड होऊ शकली नसल्याची खंत उमेदवारांनी व्यक्त केली. अशा पद्धतीने अन्याय होऊ नये अशी मागणीही त्यांनी केली.
गृहसचिव आणि लवादाकडे दाद मागणार: याप्रकरणी राज्य सरकारच्या गृह विभागाचे सचिव यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले असून सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर लवादाकडेही या संदर्भात तक्रार दाखल केली गेली आहे. आपल्याला लवादाकडून नक्कीच न्याय मिळेल, त्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे या उमेदवारांनी सांगितले.