मुंबई - गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात कमी-जास्त प्रमाणात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हळूहळू सर्व ठिकाणे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, धार्मिक स्थळे उघडण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही, त्यामुळे मंदिरे बंद आहेत. मंदिरे तात्काळ उघडण्यात यावीत, या मागणीसाठी भाजपाने मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराबाहेर लाक्षणिक उपोषण केले. 'मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा अजब तुझे सरकार' अशा घोषणा भाजपा कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी दिल्या आहेत.
संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू केले मात्र, मंदिरे बंद ठेवली आहेत. शासनाच्या या काळ्या निर्णयाविरोधात आम्ही राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण केले आहे. सरकारने त्वरित मंदिरे उघडली नाहीत, तर सविनय कायदेभंग करत मंदिरात प्रवेश करू, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.
मंदिरांवर अनेकांची उपजीविका अवलंबून आहे. फुलविक्रेते, नारळविक्रेते, प्रसादविक्रेते यांना गेल्या आठ महिन्यांपासून काम नाही. त्यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. शासनाने त्यांचा तरी विचार करावा आणि मंदिरे सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी. त्यासाठी एक नियमावली तयार करावी. आपण नियमांची कडक अंमलबजावणी करू, असेही दरेकर म्हणाले.
सिद्धिविनायक मंदिरासमोर भाजपा कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.