नवी मुंबई - विविध प्रलंबित मागण्यासाठी माथाडी कामगार आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज लाक्षणिक बेमुदत संप केला. या संपामुळे नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे. मुंबईतील पाचही बाजारपेठा या संपात सहभागी झाल्या आहेत.
राज्यात आजवर आलेल्या सर्व सरकारांना माथाडी कामगारांचे प्रश्न माहीत आहेत. मात्र, तरी देखील ते सोडवेल गेले नाहीत. त्यामुळे माथाडी कामगारांच्या या प्रलंबित मागण्यांसाठी आज माथाडी कामगारांनी एपीएमसी बंदची हाक दिली आहे. एपीएमसीमधील पाचही बाजारपेठा बंद ठेऊन सर्वजण बंदमध्ये सामील झाले आहेत. राज्यशासनाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात माथाडी कामगारांचे प्रश्न देखील मार्गी लागावे व सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज बंद ची हाक दिली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंद पुकारण्यात येईल, असा इशारा माथाडी कामगार संघटनांनी दिला आहे
माथाडी कामगारांच्या मागण्या -
माथाडी कामगारांच्या विविध ११ मागण्या आहेत.
- माथाडी कामगारांना अत्यावश्यक सेवेत सामावून घेणे
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांना आर्थिक साहाय्य मिळावे
- कोविड काळात जसे डॉक्टर, पोलीस, महानगरपालिका कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून विमा कवच दिले, त्याप्रमाणे माथाडी कामगारांनाही विमा कवच मिळावे
- माथाडी कामगारांना कामावर येण्यासाठी रेल्वे पास व तिकीट द्यावे
- राष्ट्रीयकृत बँका व पतपेढीकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची माथाडी बोर्डाकडून कपात न होण्याबाबत कामगार विभागाने काढलेला निर्णय रद्द करावा.
- विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत, माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे.
- नाशिक येथील माथाडी कामगारांच्या लेव्हीच्या प्रश्नःची सोडवणूक करावी.
- विविध माथाडी मंडळावर पूर्णवेळ चेअरमन सेक्रेटरीची नेमणूक करावी.
- माथाडी अॅक्ट 1969 अन्वये स्थापन झालेल्या सल्लागार समितीची पुनर्रचना करून त्यावर संस्थापक नेमावेत.