मुंबई - सध्याच्या काळात मोबाईल लोकांच्या जीवनातील अविभाज्य अंग बनला आहे. हाच मोबाईल सध्या नाट्यगृहांची आणि नाट्य संस्थांची डोकेदुखी बनला आहे. नाट्यगृहात नाटकाचे प्रयोग सुरू असताना प्रेक्षकांच्या मोबाईलची बेल वाजल्याने अनेक नाट्य कलावंतांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनी नाट्यगृहात जॅमर बसवण्याची मागणी केली. त्यानुसार केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर नाट्यगृहात जॅमर बसवण्याबाबत हरकती आणि सूचना मागवून त्यावर निर्णय घेतला जाईल. मात्र, जॅमर बसवल्यावर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला आयोजक जबाबदार असतील असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
नाट्यगृहामंध्ये नाटक सुरू होण्यापूर्वी मोबाईल सायलंट किंवा बंद करण्याच्या सूचना केल्या जातात. त्यानंतरही अनेक वेळा नाटकाचे प्रयोग सुरु असताना मोबाईलच्या रिंग वाजल्याने नाट्यकलावंत विक्रम गोखले, सिध्दार्थ जाधव, सुमित राघवन, सुबोध भावे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकारानंतर नाट्यगृहात जॅमर बसवण्याची मागणी जोर धरू लागली. या मागणीला पाठिंबा म्हणून शिवसेनेच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनी पालिकेच्या सभागृहात ठरावाची सूचना मांडली.
हेही वाचा - 'सरकार नेमकं कुणाच्या बाजूनं?, उन्नावमध्ये मागील ११ महिन्यात ९० बलात्कार'
सभागृहात ही ठरावाची सूचना मंजूर झाल्यावर पालिका आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आली. आयुक्तांनी त्यावर अभिप्राय देताना महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवण्यापूर्वी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात दिली. जॅमर बसवावेत किंवा किंवा याबाबत 3 दिवसांच्या कालावधीमध्ये नाट्यनिर्माते, संस्था यासह नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात येईल आणि त्यानुसार निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. तर केंद्र सरकारच्या संबंधित विभागाच्या परवानगीनंतरच मोबाईल जॅमर नाट्यगृहात बसवण्यात येतील, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - हैदराबाद पोलिसांचे स्वागत, न्यायव्यवस्था जलद गतीने चालावी - प्रदीप शर्मा
आपत्कालीन परिस्थिला आयोजक जबाबदार -
नाट्यगृहात जॅमर बसवल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांना तसेच प्रेक्षकांना भ्रमणध्वनीद्वारे कोणताही संपर्क साधता येणार नाही. महापालिकेकडून बसवण्यात येणार्या जॅमरची सुविधा संबंधित नाट्यनिर्माता, संस्था, आयोजक तसेच आरक्षणकर्ते यांच्याकडून लेखी स्वरुपात मागणी केल्यास प्रशासनाच्या मंजूर अटी आणि शर्तींनुसार उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच ही जॅमर यंत्रणा बसवल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधितांची राहील, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.