मुंबई Mid Day Meal : चेंबूरमधील आणिक गाव परिसरातील महापालिकेच्या शाळेत वितरित करण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनामुळे हिंदी माध्यमाच्या सहावी आणि सातवीच्या १६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. दरम्यान, या सर्व मुलांना सध्या गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तसंच सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांवर उपचार सुरू : शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका सहकारी संस्थेमार्फत शाळेत मध्यान्ह भोजन देण्यात आलं. इयत्ता सहावी आणि सातवीमधील विद्यार्थ्यांना हे जेवण दिल्यानंतर काही वेळातच त्यांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ मुलांना शताब्दी रुग्णालयात दाखल केलं.
२४० विद्यार्थ्यांपैकी केवळ १६ विद्यार्थ्यांना त्रास : घटनेची माहिती मिळताच विभागप्रमुख प्रमोद शिंदे, स्थानिक माजी नगरसेविका निधी शिंदे, माजी नगरसेविका अंजली नाईक, माजी नगरसेवक अनिल पाटणकर शाखाप्रमुख विजय नागावकर, उमेश करकेरा, अविनाश शेवाळे यांनी रुग्णालयात धाव घेतली. २४० विद्यार्थ्यांपैकी फक्त १६ विद्यार्थ्यांना त्रास झाल्यानं नेमकं या मागचं कारण काय, हे शोधून काढण्याची मागणी स्थानिक माजी नगरसेविका निधी प्रमोद शिंदे यांनी केली. दरम्यान, या घटनेनंतर शिक्षण सहआयुक्त डी. गंगाधरण यांनी शाळेत जाऊन पाहणी केली. तसंच खाद्यपदार्थ बनवण्यात येणारी जागा आणि रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत त्यांनी आढावा घेतला.
दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश : या शाळेला सहकारी संस्थेनं पुरवठा केलेल्या आहारामुळे सदर विद्यार्थ्यांना 'विषवाधा झालेली असल्याची बाब निदर्शनास आल्याची माहिती महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. त्यामुळे सदर संस्थेच्या स्वयंपाकगृहाची पाहणी करुन स्वयंपाकगृहातील उरलेल्या आहाराचा नमुना व इतर साहित्य तपासणीसाठी मनपा प्रयोगशाळेत पाठविण्यात आलाचे सदर अधिकाऱ्यानं यावेळी स्पष्ट केलं. तर, महापालिका आयुक्तांनी सदर घटनेची दखल घेऊन जबाबदार संस्था, संबधित अधिकाऱ्यांची चौकशी करुन २४ तासांच्या आत अहवाल सादर करणं व दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याचंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे.
हेही वाचा -