मुंबई - मुलुंड पूर्वच्या लक्ष्मीबाई इंग्रजी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी मानव सेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आहेत. शाळेतील आजी व माजी विद्यार्थी यांनी भरभरून प्रतिसाद देत मदत एकत्र करत पूरग्रस्त भागासाठी पाठवण्यात आली आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी आलेल्या महापुरात शेतीचे, घरांचे मोठे नुकसान झाले. यात नागरिकांना जीवही गमवावा लागला. शेतात पाणीच पाणी असल्याने पिके भुईसपाट झाली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कित्येक शाळांमध्ये पुराचे पाणी भरले होते. यामुळे शाळेतील साहित्य नष्ट झाले आहे.
मुलुंडच्या लक्ष्मीबाई इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शाळेने आजी माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले होते. यात भरभरून प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थ्यांनी जे जमेल तेवढे धान्य, औषधे, शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणात जमा केले.
या उपक्रमामागील हेतू स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना सामाजिक जाणिव असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे मदत करून विद्यार्थ्यांनी खारीचा वाटा उचलला असल्याचे शाळेचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.