मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 प्रकल्पातील आरे कारशेड, आरेतून हलवावे, यासाठी 7 वर्षांपूर्वी 'सेव्ह आरे' जनचळवळ उभारण्यात आली. या जनचळवळीला मोठे यश मिळाले आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आरेची साइट पूर्णपणे बंद करत तेथील साहित्य-मशीन हलवल्या आहेत. कारशेड आरेबाहेर गेल्याने सेव्ह आरे ग्रुपने आनंद व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो 3 आरे कारशेड आरेतून बाहेर नेण्याचे आदेश देत, त्यादृष्टीने डीपीआर तयार करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानुसार अखेर एमएमआरसीने आरेतून आपला गाशा गुंडाळला असून समान हलवले जात आहे, अशी माहिती सेव्ह आरे चळवळीतील स्टॅलिन दयानंद यांनी दिली. मंगळवारपर्यंत सर्व मशीन हटवल्या आहेत. तर, काम याआधीच पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता आरेतील हा परिसर मोकळा श्वास घेणार हे स्पष्ट झाले आहे. तर, ही आमच्यासाठी खूप मोठी आणि आनंदाची बाब आहे, असेही ते म्हणाले. यासाठी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे त्यांनी आभार मानले आहेत.
कारशेड हलवण्यासाठी आम्ही 2012पासून लढा देत होतो. पण या आधीच्या सरकारने काही लक्ष दिले नाही. इतकेच नव्हे तर, आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न कितीतरी वेळा झाला. आम्हाला तुरुंगात डांबले. पण आम्ही न्यायाची लढाई लढत होतो. या लढाईला अखेर यश आले आहे. पण आता आरेतील इतर प्रकल्प हटवण्यासाठी लढाई तीव्र करू. जोपर्यंत संपूर्ण आरे संरक्षित होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. सेव्ह आरेची लढाई सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया सेव्ह आरेच्या सदस्या तसनीम शेख यांनी दिली.
450 कोटी वाया?
आरे कारशेडसाठी आतापर्यंत 450 कोटी खर्च झाल्याची माहिती एमएमआरसीने राज्य सरकारला कळवली आहे. पण सेव्ह आरेने याचाही समाचार घेतला आहे. मुंबईला वाचवण्यासाठी इतका खर्च वाया गेला तरी चालेल, अशी प्रतिक्रिया सेव्ह आरेकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा - पुनर्विकास घोटाळा प्रकरण : सारंग वाधवानला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक
हेही वाचा - बलात्कार म्हणजे पीडितेची प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त करण्यासारखेच - उच्च न्यायालय