मुंबई : एका जोडप्याकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की झाली. यात 26 वर्षीय एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सायन उपनगरीय रेल्वेस्टेशनवर रविवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला अटक करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश राठोड असे मृताचे नाव आहे.
रेल्वेखाली चिरडला : मिळालेल्या माहितीनुसार, सायन रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्याचा एक महिलेशी वाद झाला. त्यानंतर महिलेचा पती तेथे आला. त्यानंतर त्याने 26 वर्षीय कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान एसटी कर्मचाऱ्याचा तोल गेल्याने तो रेल्वे रुळावर पडला. त्याचवेळी रुळावर येणाऱ्या रेल्वेखाली तो चिरडला गेला. या प्रकरणाची माहिती रेल्वे पोलीस (जीआरपी) अधिकाऱ्याने दिली. सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अविनाश माने (31) आणि त्याची पत्नी शीतल माने (30) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे जोडपे सायन स्थानकावर उपनगरीय ट्रेनमधून उतरले होते. तेथे राठोडशी त्यांचा वाद झाला.
नवऱ्याची धक्काबुक्की : काही कारणावरुन शीतल माने आणि एसटी महामंडळचा कर्मचारी राठोडमध्ये वाद झाला. राठोड हा पत्नीला शिवीगाळ करत असल्याचे पाहून अविनाशही राठोडशी वाद घालू लागला. त्या दोघांचे भांडण टोकाला गेले. शाब्दिक बाचाबाची दरम्यान अविनाश माने याने रागाच्या भरात राठोडला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यात राठोडचा तोल सुटल्याने तो रुळावर पडला. त्यानंतर धावत्या उपनगरीय रेल्वेखाली आला.
जोडप्याला अटक : रेल्वेखाली आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्याला जवळील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर जोडप्याने घटनास्थळावरुन पळ काढला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अविनाशला अटक केली. अविनाश माने धारावी भागात राहतो. त्याला अटक करण्यात आल्यानंतर पत्नीलाही पोलिसांनी पकडल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. या जोडप्यावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-