मुंबई - पावसाळ्यातील आपत्तीना तोंड देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सज्ज झाले आहे. मुंबईमहानगर परिसरातील एमएसआरडीसीच्या प्रकल्पात पाणी साचणे, झाड कोसळणे यासह अन्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी एमएसआरडीसीने 24 तास सुरू राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष आजपासून कार्यान्वित झाला आहे.
एमएसआरडीसीकडून सी लिंक, रस्ते रूंदीकरण, उड्डाणपूल असे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प मुंबई आणि मुंबई महानगर परिसरात राबवले जात आहेत. या प्रकल्पाच्या परिसरात पाणी साचून वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आलेले आहेत. मात्र, प्रत्यक्ष पावसात नागरिकांना काही समस्या उद्भवल्यास त्याचे निवारण करण्यासाठी 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
30 सप्टेंबरपर्यंत हा कक्ष कार्यान्वित राहणार आहे. हा कक्ष मुंबई महानगरपालिका आणि अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षासह इतर आपात्कालीन कक्षांशी संलग्न असणार आहे. त्यामुळे तक्रारीचे तत्काळ निवारण होणे सोपे जाणार आहे. ०२२-२६४२०९१४ / २६५१७९३५, मोबाईल क्रमांक - ८८२८४२०२६० या क्रमांकावर संपर्क साधत नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदवता येतील.