मुंबई - जुन्या ठाणे खाडी पुलावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) तिसरा खाडी पूल बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे कंत्राट एल अँड टी कंपनीला याआधीच देण्यात आले असून आता वर्कऑर्डरही देण्यात आली आहे. त्यानुसार आता आठवड्याभरात कामाला सुरुवात करत 2024पर्यंत हा पूल वाहतुकीस उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
...म्हणून तिसरा पूल
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारे दोन ठाणे खाडी पूल सध्या अस्तित्त्वात आहेत. एक पूल 1973 मध्ये बांधण्यात आला आहे. तर दुसरा पूल 1994 मधील आहे. 1973 मध्ये बांधण्यात आलेल्या पुलावरून केवळ हलक्या वाहनांना वाहतुकीस परवानगी आहे. त्यामुळे वाहतूकीचा सगळा भार 1994 मध्ये बांधण्यात आलेल्या पुलावर पडतो. परिणामी या पुलावर मोठी वाहतूक कोंडी होते. या प्रचंड वाहतूक कोंडीला प्रवासी, वाहनचालक वैतागले आहेत. ही बाब लक्षात घेत तिसरा ठाणे खाडी पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएसआरडीसी हा पूल बांधणार आहे. तर हा पूल वाहतूक सेवेत दाखल झाल्यास वाहतूक कोंडी दूर होणार आहे.
पुलासाठी 800 कोटी खर्च
तिसरा ठाणे खाडी पूल सहा मार्गिकांचा आहे. यासाठी सुमारे 800 कोटी खर्च अपेक्षित आहे. महत्वाचे म्हणजे या पुलासाठी मोठ्या संख्येने तिवरांची कत्तल करण्यात येणार आहे. वाशी ते तुर्भे पट्ट्यातील 1.5 हेक्टरवरील तिवरे यासाठी कापली जाणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पालाही पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत आहे. पण असे असले तरी एमएसआरडीए मात्र आता या प्रकल्पाच्या कामाला आठवड्याभरात सुरुवात करणार असल्याची माहिती एमएसआरडीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे मुंबई-नवी मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.
हेही वाचा - दिवाळीला गर्दी कमी करा, कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सहकार्य करा - पालिका आयुक्त
हेही वाचा - हिवाळी अधिवेशनाचा पेच सुटणार; कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार निर्णय