मुंबई- मुंबई ते गोवा दरम्यानच्या प्रवासाचा वेळ आता लवकरच कमी होणार आहे. मुंबईकरांना आपल्या आवडत्या पर्यटनस्थळी अर्थात गोव्याला केवळ 5 तासांत पोहचता येईल. कारण कोकण एक्सप्रेस वे प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे. 500 किमीच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ने व्यवहार्यता तपासणीसाठी निविदा मागवल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी 500 किमीच्या मुंबई-गोवा एक्सप्रेस वे ची घोषणा काही महिन्यापूर्वी केली होती. 701 किमीच्या मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर या एक्सप्रेस वे ची घोषणा करण्यात आली होती. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प पुढे आणला गेला. त्यानुसार आता एमएसआरडीसीने यावर काम सुरू केले आहे. या प्रकल्पाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकत मंगळवारी प्रकल्पाच्या व्यवहार्यता तपासणीसाठी निविदा मागवली आहे.
गोवा हे मुंबईकरांचे आवडते पर्यटन स्थळ आहेच. पण त्याचवेळी सिंधुदुर्ग-मालवण, रत्नागिरीही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तर मुंबईत मोठ्या संख्येने कोकणवासीय आहेत. सध्या कोकणात, गोव्याला जाण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. 12 ते 13 तास लागतात. पण कोकण एक्सप्रेस वे मुळे हा त्रास कमी होणार आहे. एक्स्प्रेस वेच्या कामानंतर केवळ 5 तासात मुंबईहून गोव्याच्या सीमेपर्यंत जाता येणार आहे.
एमएसआरडीसीच्या निविदेनुसार रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातून हा एक्सप्रेस वे जाईल. तर शिवडी-नाव्हा-शेवा (एमटीएचएल) सागरी सेतू जिथे संपतो त्या रायगडमधील चिर्ले गावातून या एक्सप्रेस वेला सुरुवात होणार आहे. तर सिंधुदुर्ग मधील पत्रादेवी या गोव्याच्या सीमेलगत येऊन संपेल. त्यामुळे मुंबईतुन शिवडीमधून निघून थेट गोव्याच्या सीमेपर्यंत केवळ 5 तासांत पोहचता येणार आहे. आता या प्रकल्पाचा अभ्यास होईल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया होईल. पण हा प्रकल्प झाला तर मुंबईत काम करणाऱ्या कोकणातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.