मुंबई : नारायण राणे सार्वजनिक मंचावरुन तसेच माध्यमातून माझ्याविषयी आणि शिवसेनेबाबत बिनबुडाचे आरोप करीत असतात. हे आरोप त्यांनी सिद्ध करावेत. अन्यथा माफी मागावी. माझे वकील सार्थक शेट्टी यांच्यामार्फत मी त्यांना कायदेशीर कारवाईबाबत नोटीस बजावली आहे. कर नाही तर डर कशाला? जय महाराष्ट्र!, असं ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. नारायण राणे यांनी या नोटीसनंतर माफी मागितली नाही, तर न्यायालयात त्यांच्यावर खटला दाखल करणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. नारायण राणे व खासदार संजय राऊत यांच्यातील वाद वाढतच चालले आहे.
संजय राऊत यांनी केले ट्विट : माणसाने भाजपच्या नादाला लागून किती खोटे बोलावे याला ही काही मर्यादा आहेत. नारायण राणेंनी सतत माझ्याविषयी काही वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे मी त्यांना कोर्टाची नोटीस पाठवली आहे. नारायण राणेंनी या नोटिसीनंतर माफी मागितली नाही, तर न्यायालयात त्यांच्यावर खटला दाखल करेन. किरीट सोमय्यांवर देखील मी खटला दाखल करणार आहे. फक्त मीच नाही, तर शिवसेनेच्या ज्या नेत्यांवर अशाप्रकारचे आरोप होत आहेत, ते सर्व नेते खटले दाखल करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
राऊतांचा राणेंना जोरदार टोला : संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या वक्तव्यांना प्रत्युत्तर देताना जोरदार टोला लगावला. नारायण राणे उद्या आपणच बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुखपदी नियुक्ती केली असेही म्हणतील, असे संजय राऊत म्हणाले. नारायण राणे म्हणतात, २००४ साली त्यांनी मला खासदार केले. माझी नेमणूक करण्यासाठी नारायण राणे हे शिवसेना प्रमुख होते का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी काय करत होते? आता नारायण राणेंनी बाळासाहेबांची शिवसेना प्रमुख म्हणून मीच निवड केली, हे सांगणे बाकी आहे. नारायण राणे काहीही वक्तव्ये करु शकतात. 2004 साली मी सामनाचा संपादक होतो. माझे मतदारयादीत नाव नाही असेही म्हणाले. आता २५ वर्षापासून मी मतदान करत आहे. माझे शिक्षण मुंबईत झाले. मी देशाचा नागरिक आहे. मला मतदानाचा हक्क आहे. २००४ साली देखील माझे नाव मतदार यादीत होते, असे संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या या नोटीसनंतर राणेंच्या अडचणींत काही वाढ होईल, का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.