मुंबई : युवासेना प्रमुख शिवसेना आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर हैद्राबाद येथील कार्यक्रमात भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अटकेला घाबरले होते. मातोश्रीवर येऊन रडत महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी विनंती केल्याचा खळबळजनक दावा आदित्य ठाकरे यांनी केला. राजकीय वर्तुळात यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्या दाव्याला दुजेरा दिला.
'हे' शिवसैनिक होऊच शकत नाहीत : आदित्य ठाकरे यांनी केलेल्या विधानात तथ्य आहे. एकनाथ शिंदे माझ्या घरी आले तेव्हा, मला तुरुंगात जायचे नाही. तुम्ही काहीतरी करा, आघाडी तोडा अशी गयावया केली होती. तुरुंगात का आणि कोण कशासाठी पाठवणार? असा प्रश्न शिंदे यांना विचारला. तसेच ज्या पक्षाने आपल्याला सर्व काही दिले, त्या पक्षासोबत ठाम राहायला हवे. आपण शिवसैनिक लढणार आहोत. प्रसंगाला सामोरे जाऊ, मला अटक करायला आले तर त्यांना थांबवू नका, मला अटक करा असे मी कारवाई करणाऱ्यांना सांगेल, असे मी म्हणालो होतो. गळ्यातील शिवसेनेचा भगवा फडकवत ईडी अधिकाऱ्यांसोबत गाडीत बसलो. मी काहीही केले नसताना तुरुंगात गेलो, पण घाबरलो नाही. शरीर वाघाचे आणि काळीज उंदराचे असा शिवसैनिक असू शकत नाही, अशा शब्दांत राऊतांनी शिंदे गटाला ठणकावले.
'ते' कारवाईला घाबरुन पळाले : देशात धाकदपटशा सुरू आहे. पिढीची भीती दाखवली जात आहे. अशा संकटात आपण उभे राहिलो तरच नायक ठरेल. बाळासाहेबांनी दिलेला मंत्र आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आपण चुकीचे काही केले नाही, तर आपल्याला घाबरण्याची गरजच नाही. परंतु, शिंदेंना तुरुंगात टाकण्याची भीती वाटत होती. सतत महाविकास आघाडी तोडावी अशी विनंती करत होते. आज शिंदेंसोबत गेलेले अनेकजण कारवाईला घाबरून पळाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सोबतही आता तेच सुरू आहे, असे राऊत म्हणाले.