मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री आव्हान देत असताना आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत ? शिंदे गटाचे खासदार केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटायला नव्हते, हे खासदार कुठे पळत आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला कुलूप लावले आहे. त्यांची निशाणी कुलूप आहे, ढाल तलवार नाही. चावी दिली तरच तोंड उघडतात. आम्ही जोरदार भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वाभिमान कुठे गहाण ठेवला आहे ? केंद्रीय मंत्र्यांनी मध्यस्थीची भूमिका मांडली असताना मुख्यमंत्री ऐकत नाहीत. आमचे मुख्यमंत्री गप्प आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत जोरदार भूमिका घ्यायला हवी होती. असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका (MP Sanjay Raut criticized CM Eknath Shinde) केली.
चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा : ज्या पक्षाचे नेते छत्रपतींचा अवमान करतात, आदर्श मानत नाहीत. महापुरुषांना मानत नाहीत. तुमच्या पक्षाला मिळालेली देणगी ही भीकच म्हणावी लागेल. महाराष्ट्रातील दैवतांना भिकारी म्हणतात. ते दुर्दैवाने आमचे राज्यकर्ते आहेत, त्यांना माफी मागावी लागेल असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा (CM on Maharashtra Karnataka Borderism) साधला.
शिंदे सरकारचा समाचार : कर्नाटक सीमा प्रश्नांवरून दोन्ही राज्यांमध्ये रान उठले आहे. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. महाराष्ट्रात विरोधकांनी सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपला घेरले आहे. या सर्व घडामोडींवर शुक्रवारी महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी यावर आक्रमक भूमिका मांडली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे सरकारचा यावरून जोरदार समाचार घेतला.
काय मध्यस्थी करणार : राऊत पुढे म्हणाले की, सुप्रिया सुळेंनी जोरदार भूमिका मांडली. शिंदे गटाचे खासदार सगळे पळून गेले होते. महाविकास आघाडीचे खासदार अमित शाह यांना भेटले. लोकसभेतही आमचे खासदार बोलत होते. पण या (शिंदे गट) पळपुट्या खासदारांनी सीमाप्रश्नावर तोंड उघडले नाही, महाराष्ट्राच्या इतिहासात याची नोंद राहील. बोम्मई म्हणतात एक इंचही जमीन देणार नाही, अमित शाह यांचे ऐकणार नाही. मग अमित शाह नेमकी काय मध्यस्थी करणार आहेत? असाही प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला. तसेच महाराष्ट्राचा अपमान करावा, यासाठीच हे षडयंत्र आहे. अशावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जोरदार उठून उभे राहायचे असते. पण तेच बसले आहेत, असे राऊत म्हणाले.