मुंबई - दिल्लीत जे आज झाले त्याला मी राष्ट्रीय स्तरावरील लाजिरवाणी गोष्ट मानतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज संपूर्ण जग देशाचे सामर्थ्य पाहत असताना दुपारनंतर संपूर्ण जगाने दिल्लीच्या रस्त्यांवर जे दृश्य पाहिले. हे आंदोलकांना शोभत नाही किंवा सरकारलाही शोभत नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मुंबईत माध्यमांशी ते संबाध साधत होते. खासदार राऊत म्हणाले, दोन महिन्यांपासून संयमाने आणि शांततेत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. इतके शिस्तबद्ध आंदोलन जगात कधीही झाले नसल्याचे म्हटले जात होते. मग आज अचानक शेतकऱ्यांचा बांध फुटला. ही आराजकता का घडली, सरकार काय करत होते. सरकार याच गोष्टीची वाट पाहत होती का, असा आरोपही त्यांनी केला आहे.
दिल्लीतील वातावरण बिघडण्यास अंहकारी सरकारच जबाबदार
राजधानी दिल्लीत देशाच्या गौरवाच्या दिनी घडलेला हिंसाचाराचा निषेध करत खासदार राऊत म्हणाले, दिल्लीतील वातावरण बिघडले आहे. याला अहंकारी सरकारच जबाबदार आहे.
कुठले अदृश्य हात राजकारण करत आहेत
सरकार याच दिवसाची वाट पाहत होती का, सरकारने शेवटपर्यंत लाखो शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले नाही. ही कुठल्या प्रकारची लोकशाही आमच्या देशात वाढत आहे. ही लोकशाही म्हणता येत नाही. जर सरकारला वाटले असते, तर हिंसा थांबवता आली असती. दिल्लीमध्ये जे सुरू आहे, त्याचे समर्थन करता येणार नाही. कुणीही असो लाल किल्ला आणि तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही. मात्र, वातावरण का बिघडले. सरकार शेतकरी विरोधी कायदे का रद्द करत नाही, कुठले अदृश्य हात राजकारण करत आहेत, असे असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारले आहे.
याकरीता कोणाचा राजीनामा मागणार
संजय राऊत यांनी ट्विटरवर अर्ध्या तासामध्ये दोन ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये राऊत असे म्हणतात की, दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या. याकरिता कोणाचा राजीनामा मागणार, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार की जो बायडेनचा, इस बात पर त्यागपत्र, राजीनामा तो बनता है साहेब, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
हेही वाचा - दिल्लीतील अराजकतेवर आता जो बायडेनचा राजीनामा मागणार का, राऊतांचा भाजपाला टोला