मुंबई : रविवारी मुंबईतील दादर येथे काही हिंदू संघटनांनी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला. शिवाजी पार्क येथून या मोर्चाला सुरुवात झाली होती. या मोर्चात अनेक हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे लागू करण्याची मागणी करत मोर्चा काढण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोस्टर झळकावण्यात आले. या मोर्चात शिंदे गटाच्या नेत्यांसह भाजपचे नेतेही सहभागी झाले होते. यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
लोकांचा गैरसमज तो मोदींविरोधात मोर्चा : यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, रविवारी मुंबईत जो मोर्चा काढण्यात आला त्यात काही ठराविक संघटना सोडता ती भाजपचीच रॅली होती. तो काही हिंदू जनआक्रोश वगैरे नव्हता. लोकांचा असा गैरसमज आहे की तो मोदींच्या विरोधातील आक्रोश होता. खरतर भाजपमध्ये पंतप्रधान मोदी, अमित शाहा, देवेंद्र फडणवीस यांच्या सारखे कडवट नेते असताना लवजीहाद होत असेल तर हे योग्य नाही. अशी खोचक टीका खासदार राऊत यांनी केली आहे.
तेंव्हा यांच्या तोंडाला बूच असते : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राज्यातले महाविकास आघाडी सरकार पाडून सध्या जे काही सरकार सत्तेत बसले ते आपण हिंदुत्वासाठी एकत्र आल्याचे नेहमीच सांगत होते आणि आता देखील सांगतात. मग यांच्याच काळात जर त्यांना असे मोर्चे काढावे लागत असतील, हिंदुत्वाचा आधार घ्यावा लागत असेल आणि यांच्याच काळात जर लव्ह जिहाद सारख्या घटना वाढल्याचे ते स्वतःच सांगत असतील तर हा थेट मोदी आणि शाहा यांच्याच नेतृत्वावर उपस्थित केलेला प्रश्न आहे. म्हणून ते बाळासाहेब ठाकरेंच्या समोर आलेत. शिवाजी महाराजांच्या अपमान चालतो. तेंव्हा यांच्या तोंडाला बूच असते. काश्मिरचा अपमान चालतो. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान केला जात नाही. हे चालते तेंव्हा हे बोलत नाहीत.