मुंबई : संपूर्ण राज्याच लक्ष पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका बिनविरोध होणार का? इथे उमेदवारी कोणाला मिळणार? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अखेर महाविकास आघाडी व भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला.
भाजप शिंदे गट सुडाचे राजकारण : यावेळी बोलताना खासदार संजय राऊत यांनी त्यांचे मत मांडले. ते म्हणाले, की या दोन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी पत्र लिहिल्याचे समजले. ही पोटनिवडणुक बिनविरोध करण्याचे आवाहन चांगले आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक होत असेल तर ती बिनविरोध व्हावी ही महाराष्ट्राची आतापर्यंतची परंपरा होती. जी इतकी वर्ष आम्ही सर्वांनी पाळली. पण, राज्यात घाणेरडे राजकारणाची सुरुवात कोणी केली? देवेंद्र फडणवीस म्हणाले होते राजकीय वातावरणात कटुता आहे. मग त्यांनी पुढाकार का घेतला नाही? भाजप आणि शिंदे गट सुडाचे राजकारण करत आहेत."
महाविकास आघाडी म्हणून आम्ही सहकारी पक्षांसोबत : पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, या पोटनिवडणुकीत काँग्रेसने देखील त्यांचा उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेसने जागा लढवणार असे ठरवले होते. त्यानुसार आम्ही त्यांनाही जागा दिलेली आहे. या निवडणुका होतील. सध्याचे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता कसबा आणि पिंपरी चिंचवडमधील वातावरण सरकारसाठी अनुकूल नाही. राज ठाकरे यांनी पत्र लिहिले असले तरीही निवडणुका होतील. महाविकास आघाडी म्हणून आम्ही दोन्ही सहकारी पक्षांसोबत राहू. अंधेरी पोटनिवडणूक हा अपवाद असला तरी तिथे निवडणूक झाली. अंधेरी पोटनिवडणुकीत निवडणूक न लढण्याची परंपरा पाळली गेली नाही. तेथील लोकांची इच्छा सुद्धा निवडणूक व्हावी अशीच आहे त्यामुळे निवडणुका होतील, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.