मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. आज देखील शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या विशेष शैलीत भाजपमध्ये दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांवर टीका केली. 'पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेले घुसखोर महाराष्ट्र आणि देशात हैदोस घालतात. वातावरण बिघडवतात. तसं भाजपमध्ये आलेल्या घुसखोरांनी माहौल बिघडवला आहे. त्यामुळे भाजपला शुद्धीकरणाची गरज आहे', असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. नारायण राणेंवर हा हल्ला आहे.
राणेंवर घणाघाती हल्ला
'बाहेरचा माणूस येतो, शिवसेना भवनावर दगड मारण्याची भाषा करतो. कोणी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारेन असा बोलतो. हे मूळ भाजपचा माणूस बोलणार नाही. हे बाहेरचे बाडगे बोलतात. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार हे कधी बोलणार नाहीत. बोलणारे सगळे बाहेरून आलेले लोक आहेत', असेही राऊत यांनी सांगितले.
राणेंनी स्वातंत्र्य संग्रामाबाबत सांगायची गरज नाही- राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वातंत्र्य दिनाचा हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव समजून सांगण्यासाठी भाजपकडून पत्रं लिहिली जाणार आहेत. या मोहिमेचा देखील राऊत यांनी समाचार घेतला आहे. 'त्यांना लिहिता वाचताही येतं? चांगली गोष्ट आहे. आम्हाला स्वातंत्र्य संग्रामाबाबत सांगायची गरज नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र दोन्ही राज्ये क्रांतीकारकांची भूमी आहे. बंगाल आणि महाराष्ट्राच्या योगदानाची राणे यांना माहिती नाही. ते आम्हाला स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व सांगत आहेत. त्यांनी आधी इतिहास वाचावा. भाजपने त्यांना इतिहासाचं पुस्तक द्यावं', असेही राऊत म्हणाले.
'माझ्याकडेही 100 जणांची यादी'
'शिवसेना नेत्यांच्या पाठीमागे ईडी लागली तरी काही हरकत नाही. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड या ठिकाणी तपास यंत्रणा वेगाने काम करताना दिसती. मग इतर राज्यात काही घडत नाही का? त्या राज्यात बाकी राज्यांपेक्षा भयंकर घडत आहे. महाराष्ट्रात प्रताप सरनाईक, अनिल देशमुख यांच्यापाठी ईडी लावली आहे. अन्य लोकांना नोटिसा दिल्या जात आहेत. माझ्याकडेही 100 नावे आहेत. ती मी अजून दिलेली नाहीत. मी अजूनही थांबलेलो आहे. इडीचे प्रमुख अधिकारी भाजपमध्ये सामील होत आहेत. चाललंय काय?' असेही राऊत यांनी म्हटले.
'मराठा संघटनांनी आक्षेप घ्यावा'
भाजपचे प्रमोद जठार यांनी नारायण राणे यांना छत्रपती संभाजी राजे यांची उपमा दिली होती. यानंतर शिवसेना आक्रमक झाली. तक्रार देखील दाखल करण्यात आले. या वक्तव्याचाही समाचार संजय राऊत यांनी घेतला आहे. 'आम्ही शिवसेना भवनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जरा वेगळ्या पद्धतीने लावला तर मराठा संघटनांनी आक्षेप घेतला होता. मग आता अशा प्रकारे वक्तव्य करण्यात येत आहे. तर मराठा संघटनांनी भूमिका घ्यावी. संभाजी भिडेंनीही आता बंद करावे' असा सल्लाही राऊतांनी दिला.
हेही वाचा - कबीर खान यांची "द एम्पायर" वेब सिरीज कायमची बंद करा, भाजपाची मागणी