मुंबई - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पुराने थैमान घातले आहे. पुरामुळे तेथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. राज्यभरातून या पुरग्रस्त नागरिकांसाठी मदत येत आहे. राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही आपल्या निधीतून पूरग्रस्तांसाठी ५ कोटींची मदत जाहीर केली आहे.
संभाजीराजेंनी ट्वीट करत ५ कोटींची मदत देणार असल्याचे जाहीर केले. मला हे माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव-शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित असल्याचेही संभाजीराजे म्हणाले.
मदतीच्या वस्तूंवर माझा फोटो लावू नका
कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्त लोकांना जी मदत केली जात आहे, त्या मदतीच्या वस्तूंवर माझा फोटो लावू नका! जे काही द्यायचे आहे ते निस्वार्थ भावनेनं द्या! असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.