मुंबई - सध्या राज्याच्या राजकारणात अहमदनगर लोकसभेची जागा एक ज्वलंत विषय बनला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील अहमदनगरच्या जागेसाठी भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत. तर विखेंच्या भाजप प्रवेशाला विरोध करत विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी समर्थकांनी मुख्यमंत्र्यांसमोरच घोषणाबाजी करीत नाराजी व्यक्त केल्याने बंडाचे निशाण फडकविले आहे.
लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून आता उमेदवारी वरून राज्यातल्या सत्ताधारी आणि घटक पक्षात बंडाचे निशाण रोवले जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ आणि विधानसभा विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटलांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे भाजपातही गदारोळ माजण्याची शक्यता आहे.मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राजीव राजळे यांचा तब्बल अडीच लाख मतांनी दिलीप गांधी यांच्या पराभव केला होता. गांधी हे आतापर्यत पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत.
ऐनवेळी गांधी यांना डावलून विखे यांना जर खासदारकीचे तिकीट मिळत असेल तर पक्षाशी निष्ठा दाखविलेल्या कार्यकर्त्यांनी काय करायचं असा सवाल गांधी समर्थकांनी केला आहे. विखे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करत दिलीप गांधी समर्थकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच घोषणाबाजी केली. तर भाजपच्या कार्यलयात काही काळ ठिय्या आंदोलनही केले. सुजय विखेंना भाजपात घेतल्यास आम्हाला नव्या वाटा चोखळाव्या लागतात असा इशाराही गांधी समर्थकांनी दिला आहे. दरम्यान अहमदनगरच्या जागेबाबत भाजपच्या नेत्यांनी मौन धारण केले असून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही याविषयी बोलण्यास नकार दिला आहे.