मुंबई - आज मुंबईकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. जागतिक स्तरावरील लसीकरण मोहिमेला आज मुंबईसह देशभरात सुरुवात झाली आहे. तेव्हा या मोहिमेअंतर्गत पहिल्या दोन टप्प्यात 3 लाख 30 हजार जणांना कोरोना लस दिली जाणार असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
पहिल्या टप्प्यात आपण कोरोना योद्धे अर्थात डॉक्टर-नर्स-आरोग्य कर्मचारी यांना लस देणार आहोत. त्यानुसार 1 लाख 30 हजार कोरोना योध्यांची नोंद झाली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 2 लाख पोलीस, सफाई कर्मचारी इत्यादींना लस देण्यात येणार आहे. तेव्हा आजपासून जो पहिला टप्पा सुरू झाला आहे, त्यासाठी पुरेसे डोस आपल्याकडे आहेत. पुढे जसे-जसे टप्पे सुरू होतील, तशी लस ही उपलब्ध होईल, असेही चहल यांनी स्पष्ट केले आहे.
लसीकरण राबवणारा भारत हा 50 वा देश
लसीबाबत अनेकांना संभ्रम आहे. पण चहल यांनी मात्र ही लस पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. मी आता पात्र नाही, तिसऱ्या टप्प्यासाठी मी पात्र आहे. अन्यथा मी लस घेतली असती, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, जागतिक स्तरावर लसीकरण राबवणारा भारत हा 50 वा देश आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी कोविशिल्ड लस घेतली आहे. तेव्हा लस घ्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्याचवेळी पुढे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार खासगी रुग्णालयांना लसीकरण मोहिमेत सामावून घ्यायचे की नाही याचा निर्णय होईल तेही ते म्हणाले.
उपनगरीय रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार
मागील 10 महिन्यांपासून उपनगरीय रेल्वे सर्वसामान्यांसाठी बंद आहे. आता लसीकरण सुरू झाले, मग रेल्वे सेवा कधी सुरू होणार? असे विचारले असता चहल यांनी लवकरच उपनगरीय रेल्वे सेवा सुरू होईल, असे म्हणत मुंबईकरांना दिलासा दिला आहे. लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.