मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला 17 जुलैपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाचा कार्यकाळ हा 17 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत चालणार असल्याचा निर्णय झालेला आहे; मात्र हे अधिवेशन ठरलेल्या वेळेआधीच गुंडाळण्याच्या चर्चा विधानभवन परिसरात सुरू होत्या; परंतु याबाबत आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन कामकाज ठरल्यानुसार ४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
अंबादास दानवेंच्या मागणीला यश : अधिवेशनाच्या कालावधीमध्ये दोन्ही सभागृहांमध्ये जनतेच्या प्रश्नावर चर्चा होत असते आणि चर्चेतून जनतेचे प्रश्न, समस्या मार्गी लागत असतात. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अधिवेशनाचा कार्यकाळ 4 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावा, अशी मागणी केली होती. तर विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनाचा कालावधी ठरलेल्या वेळेनुसार पूर्ण करावा, अशी मागणी लावून धरली होती.
कामकाज सल्लागार समितीची बैठक : आज विधानभवनामध्ये कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. समितीच्या बैठकीत अधिवेशन कामकाज ठरल्यानुसार ४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच 31 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी विधिमंडळाच्या कामकाजाला सुट्टी असणार आहे. 29 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत विधिमंडळाला 4 दिवस सुट्टी असणार आहे. पुढील बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस अधिवेशन होणार आहे.
अधिवेशन लवकर संपवा : राज्यात मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र अनेक आमदार विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने मतदार संघात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेक आमदारांनी अधिवेशन लवकर संपवा, अशी मागणी केली होती.
खालील मुद्द्यांवर चर्चा व निर्णय:
(१) शुक्रवार, दिनांक २८ जुलै, २०२३ रोजी शासकीय कामकाज व अशासकीय कामकाज (विधेयके) होतील.
(२) शनिवार, दिनांक २९ जुलै, २०२३ (शासकीय सुट्टी)
(३) रविवार, दिनांक ३० जुलै, २०२३ (शासकीय सुट्टी)
(४) सोमवार, दिनांक ३१ जुलै, २०२३ (सभागृहाची बैठक होणार नाही.)
(५) मंगळवार, दिनांक १ ऑगस्ट, २०२३ (पंतप्रधान महोदयांचा पुणे दौरा असल्याने सभागृहाची बैठक होणार नाही.)
(६) बुधवार, दिनांक २ ऑगस्ट, २०२३, (शासकीय कामकाज)
(७) गुरुवार, दिनांक ३ ऑगस्ट, २०२३ रोजी शासकीय कामकाज, विरोधी पक्षाचा प्रस्ताव (अंतिम आठवडा प्रस्ताव)
(८) शुक्रवार, दिनांक ४ ऑगस्ट, २०२३, शासकीय कामकाज, अशासकीय कामकाज (ठराव)
बैठकीला कोण कोण उपस्थित: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, आमदार प्रवीण दरेकर, सतीश चव्हाण, विजय ऊर्फ भाई गिरकर, प्रसाद लाड, एकनाथ खडसे, अनिल परब, सतेज ऊर्फ बंटी पाटील, अशोक ऊर्फ भाई जगताप, शशिकांत शिंदे, प्रसाद लाड, कपिल पाटील, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले, उपसचिव ऋतुराज कुडतरकर, अवर सचिव पुष्पा दळवी आदी उपस्थित होते.
नुकसानीचा आढावा घेणार: अधिवेशनाला चार दिवस सुट्टी असल्यामुळे आमदार आपल्या मतदारसंघातील नुकसानीचा आढावा घेऊन ही माहिती सभागृहात देतील. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील नुकसानीचा आढावा घेऊन सभागृहात निवेदन करून नुकसानग्रस्तांसाठी मोठी मदत जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा:
- Balasaheb Thorat On Savitribai Phule : सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्यांबाबत सरकारची भूमिका संशयास्पद; विरोधकांचा सभात्याग
- Praniti Shinde On Setu Offices: सेतू कार्यालयातून सामान्य जनतेची होणारी लूट थांबवा : प्रणिती शिंदे
- Narendra Modi Gujarat Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर, राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे करणार उद्घाटन