मुंबई : विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी आज आपल्या मतदारसंघातील शासन स्तरावर कर्जत जामखेड प्रस्तावित प्रश्नावर आंदोलन सुरु केले होते. विधानभवनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ते आंदोलन करत होते. कर्जत जामखेड मतदारसंघात पाटेगाव, खंडाळा या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रस्तावित आहे. या औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जाहीर करून यासंदर्भातील बाबी पूर्ण करण्यासाठी उद्योगमंत्र्यांनी रोहित पवार यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर अधिसूचना काढण्याचे आश्वासन दिले होते.
रोहित पवार यांचा इशारा : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माझी भेट घेतली. ते उद्या बैठक बोलवणार आहेत. पुढच्या काही दिवसांत एमआयडीसीची अंतिम प्रक्रिया पूर्ण होईल, असा शब्द त्यांनी दिला आहे. म्हणून मी आजचे हे आंदोलन मागे घेत आहे. पण, जर असे झाले नाही तर माझ्या मतदारसंघामधील हजारो युवक मुंबईत येऊन आमरण उपोषण सुरू करतील, असा इशारा रोहित पवार यांनी यावेळी दिला.
शासन स्तरावर कारवाई करा : विधान मंडळाच्या कामकाजात लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न व इतर आयोजनाद्वारे मांडलेल्या विविध प्रश्नांना अश्वासन देऊनही शासन स्तरावर कारवाई होत नाही, त्यामुळे रोहित पवार विधानभवनाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पायऱ्यांवर आंदोलन केले होते. जोपर्यंत शासन स्थरावर अधिसूचना जारी होत नाही, तोपर्यंत आंदोलन जारी ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
एमआयडीसीला मान्यता : कर्जत जामखेड मतदारसंघात पाटेगाव, खंडाळा या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी 24 जुलाई 2022 रोजी सर्व शासन मान्यता मिळाली आहे. 620 हेक्टर क्षेत्र औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्तावित करण्यात आले होते. सेन्सिटिव्ह आणि बफर झोन वगळता 458.72 हेक्टर क्षेत्रात एमआयडीसीला मान्यता दिली आहे. शासन स्तरावर सर्व पाठपुरावा करून राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी त्यांच्यासोबत देखील पत्रव्यवहार केला होता. त्यांनी लवकर अधिसूचना निघेल, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही शासन स्तरावर अधिसूचना निघाली नाही. लवकरात लवकर शासन स्तरावर त्या संदर्भात अधिसूचना जारी करावी, याबाबत रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
मतदारसंघातील प्रश्नांवर आंदोलन : अर्थ खात्याचा कारभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शिंदे गट, भाजपा, आपल्यासोबत आलेल्या राष्ट्रवादीचे आमदार यांना पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी मंजूर केला आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार यांना आपल्या मतदारसंघातील प्रश्नांवर आंदोलन करण्याची वेळ आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा :
- Rohit Pawar On Cabinet Expansion : दर्जेदार खात्यांसाठी तिन्ही पक्षांमध्ये तणाव - रोहित पवार
- Rohit Pawar : 'अजित पवार मुख्यमंत्री झाले तर स्वागत करणार नाही', रोहित पवारांची जोरदार बॅटींग
- NCP Political Crisis: अजित पवारांच्या बंडाच्या निशाण्यानंतर रोहित पवार भावूक म्हणाले... राजकारणात येऊन चूक केली का?