मुंबई : प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान आमदार सुनील राणे आणि यामिनी जाधव यांनी सभागृहात राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड व्हेरिफिकेशन आणि जोडणीबाबत प्रश्न उपस्थित केला. लाखो विद्यार्थ्यांची आधार कार्ड जोडणी अद्याप बाकी आहे. त्यामुळे आता शिक्षकांच्या संच मान्यतेवर त्याचा परिणाम होईल अशी भीती या आमदारांनी सभागृहात व्यक्त केली. याला उत्तर देताना शिक्षण मंत्री केसरकर यांनी सांगितले की, आधार कार्ड तपासणीचे काम 92 टक्के पूर्ण झाले आहे.
या संदर्भात बोलताना शिक्षण मंत्री केसरकर यांनी सांगितले की, राज्यामध्ये आधार कार्ड संलग्न करण्याची मोहीम जोरदारपणे सुरू आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांची खरी संख्या आधार कार्डच्या माध्यमातून तपासली जात नाही तोपर्यंत अधिकचे शिक्षक कदाचित नेमले जाऊ शकतात आणि त्यामुळे राज्यावर अतिरिक्त बोजा पडू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची नेमकी संख्या लक्षात यावी कुठेही बोगस पटसंख्या निर्माण होऊ नये याच्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 92 टक्के विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन झाले आहे. यापैकी 58 हजार विद्यार्थ्यांकडे आधार मध्ये अनेक अडचणी असतानाही त्यांची नावे आपण पटावर समाविष्ट करून घेतलेली आहेत.
अजूनही सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन बाकी आहे यापैकी तीन लाख आठ हजार विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नाहीत अशी बाब समोर आली आहे तर एक लाख 34 हजार 369 विद्यार्थी हे स्वयंसहायित शाळांमध्ये आहेत. या सर्व बाबी तपासून घेतल्या जात आहेत. मात्र याचा कुठेही संच मान्यतेवर परिणाम होऊ दिला जात नाही, कुठेही संच मान्यता रोखण्यात आलेली नाही. असेही केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
अन्य एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये दीपक केसरकर यांनी सांगितले की राज्यांमध्ये 4650 मुले आणि 4675 मुली शाळाबाह्य होत्या शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्याची मोहीम प्रत्येक वर्षी राबवली जाते त्यानुसार यावर्षीही ती राबवली गेली आहे आतापर्यंत नऊ हजार मुलांना शाळेत आणले गेले आहे जी 300 मुले शाळेत आणता येऊ शकली नाही ती विकलांग आहेत अथवा अन्य काही अडचणींमुळे ती दाखल होऊ शकली नाहीत. मात्र त्यांच्यासाठीही शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा :