मुंबई : राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीतील मेट्रो सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सोमवारपासून मेट्रो 1 सुरू होणार आहे. तर आता या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ने मोनोरेल ही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
18 ऑक्टोबर, रविवारपासून चेंबूर ते जेकब सर्कल मोनो मार्ग वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. राज्य सरकारच्या नव्या गाईडलाइन्समध्ये मेट्रोचा उल्लेख होता. तर मेट्रो सुरू झाल्याने मोनोलाही हिरवा कंदील मिळाला आहे. या अनुषंगाने एमएमआरडीएने आज रविवारी मोनो सुरू होईल असे जाहीर केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून मोनो सेवा बंद आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बऱ्यापैकी व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी मेट्रो आणि मोनो सेवा सुरू करावी अशी मागणी वारंवार होत होती. कोरोनाचा कहर लक्षात घेता, खबरदारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोनो-मेट्रो बाबत सावध भूमिका घेतली होती. आता मात्र राज्य सरकारने मेट्रोला परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे मेट्रोला परवानगी म्हणजे मोनोलाही परवानगी मानली जाते. त्यामुळे एमएमआरडीएने रविवारी मोनो सुरू करण्याचे जाहीर केले आहे.
रविवारी मोनो सुरू झाल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. चेंबूर ते जेकब सर्कलदरम्यान प्रवास करणाऱ्याना हा दिलासा ठरणार आहे. या मार्गादरम्यान केईएम, टाटा, वाडीया सारखी रुग्णालये असून अनेक खासगी-सरकारी कार्यालयेही आहेत. त्यामुळे खासगी-सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि विशेषतः आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरला आहे.