मुंबई - सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते काल (२४ एप्रिल) ७७ व्या दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे देखील खास पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून सीआरपीएफला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, शहीदाच्या कुटुंबियांसाठी सुरू करण्यात आलेल्या 'भारत के वीर' या संस्थेला १ कोटी १८ लाखांची मदत सुपूर्द करण्यात आली.
कला आणि नृत्य विभागात शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे चाफेकर यांना आणि चित्रपट क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना दिनानाथ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांनादेखील चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले. तर, उत्कृष्ट सिनेलेखनाबद्दल सलीम खान यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ लेखक वसंत आबाजी डहाके यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या वतीने त्यांचा नातू आणि मुलीने हा पुरस्कार स्वीकारला.
'भद्रकाली प्रोडक्शन'च्या 'सोयरे सकळ' या नाटकाला यंदाचा मोहन वाघ स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश तळवलकर यांच्या 'तालयोगी' या संस्थेला आनंदमयी पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांच जाहीर अभिनंदन केले. तसेच, मंगेशकर कुटुंबीयांनी जवानांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केल्याबद्दल विशेष कौतुकही केले.