मुंबई - भाजप विरोधात राज्यात होत असलेल्या महाआघाडीत मनसेलाही सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक असून काँग्रेस सोबतच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडे असलेला कल्याण- डोंबिवली हा मतदारसंघ मनसेला सोडण्याची राष्ट्रवादीची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज राष्ट्रवादीच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या सुरुवातीला, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मनसेला सोबत घेण्याबाबत नाराजी दर्शवली असल्याचीही माहितीही सूत्रांनी दिली. मात्र अजित पवार यांनी बुधवारी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीबाबतची माहिती त्यांनी बैठकीत दिल्यानंतर नाराजीचा सूर मावळला असल्याचे सांगण्यात येत आहे.
अजित पवार म्हणाले, की राज ठाकरे यांना आघाडीत घेण्याबाबत राष्ट्रवादीमध्ये सकारात्मक वातावरण आहे, आता याबाबत काँग्रेसशी ही चर्चा करावी लागते. मित्रपक्षांना सोबत घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. मनसेची भूमिका आता बदलली आहे. राज ठाकरे आता मोदींच्या विरोधात आहेत, जे लोक मोदींच्या विरोधात आहेत, त्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे जेष्ठ नेते प्रफुल पटेल यांनीही सांगितले.