मुंबई - भाजप आणि पंतप्रधान मोदींच्याकडून सुरू असलेली चौकीदार मोहीम म्हणजे एक फास असल्याचे राज ठाकरे म्हणाले. “मैं भी चौकीदार हूं” मोहिमेची त्यांनी खिल्ली उडवली. पंतप्रधान म्हणून तुमचे विचार मोठे असले पाहिजेत, मात्र यांना काय? तर चौकीदार व्हायचे आहे, असे म्हणत मोदींच्या आवाजात त्यांच्यावर राज ठाकरेंनी टीका केली.
या 'चौकीदार'च्या मोहिमेत कोणी अडकू नका असे आवाहन करताना राज ठाकरे म्हणाले की, गेल्या चार-साडेचार वर्षांत काय करता आलेले नाही. त्यामुळे लोकांचे कशात तरी लक्ष गुंतवून ठेवण्यासाठी भाजपकडून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. भारताची निवडणूक आहे की, नेपाळची असा सवाल त्यांनी केला. इतका छोटा विचार एकाद्या पंतप्रधानाचा असेल तर, विचार करा तो माणूस कसा असेल, असे राज ठाकरे म्हणाले.
यांना चार वर्षांत काही करता आलेले नाही. त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी रचलेला हा एक फास असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले. रंगशारदा येथील मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.