मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे नवनियुक्त आमदार प्रमोद पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली आहे. यावेळी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रमोद पाटील यांचे औक्षण केले.
विधानसभा निवडणूक लढवलेल्या मनसेच्या सर्व उमेदवारांसोबत आज राज ठाकरे यांनी चर्चा केली. राज यांनी विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतला. तसेच प्रत्येकाला किती मत मिळाली, नोटाचा काय परिणाम झाला याबाबत राज यांनी माहिती जाणून घेतली.
राज्याच्या १४ व्या विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. राज्यातील सर्वात जास्त म्हणजे १०५ जागा या भाजपला मिळाल्या आहेत. तर त्याखालोखाल शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४, काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केवळ १ जागा मिळाली आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही मनसेला जुन्नरच्या फक्त एका जागेवर विजय मिळाला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद सोनवणे यांनीही मनसेला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनाही यावेळी पराभवाचा धक्का बसला. २००९ मध्ये मनसेचे सर्वाधिक १३ आमदार निवडून आले होते.