मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ मैदानावर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेनेतील वादावर ठाकरे गटासह शिंदे गटावर जोरदार तोफ डागली. शिवसेना व धनुष्यबाणाची लढाई सुरू असताना वेदना झाल्या, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना सोडताना माझा वाद हा विठ्ठलाशी नाही तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांसोबत होता, म्हणून मी शिवसेना सोडली असेही त्यांनी सांगितले.
अन्यथा गणपती मंदिर बांधू : राज ठाकरे यांनी शिवतीर्थ मैदानावरील सभेदरम्यान एक व्हिडिओ सादर केला. या व्हिडिओत माहिमधील समुद्रपरिसरात नवा हाजीअली दर्गा तयार केला जात असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. यावरून त्यांनी सरकारसोबत प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. महिन्याभराच्या आत हे अनधिकृत बांधकाम तोडले पाहिजे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, मुंबई पोलिस आयुक्त यांनी यावर कारवाई केली नाही ते तर आम्ही त्याच ठिकाणी गणपतीचे मोठे मंदिर बांधून दाखवू, असे आव्हान राज ठाकरे यांनी केले आहे.
म्हणून शिवसेनेतून बाहेर पडलो : राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर का पडलो यावर पुन्हा एकदा विधान केले आहे. मला दाबण्याचा प्रयत्न होत होता. मी उद्धव ठाकरे यांना एक दिवशी हॉटेलमध्ये घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना विचारले होते की, तुला काय व्हायचे मला फक्त काय काम करायचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे राज ठाकरे म्हणाले. पण केव्हा मी शिवसेनेतून मी बाहेर कधी पडतोय यासाठी प्रयत्न केले जात होते. यानंतर मी जेव्हा पक्षातून बाहेर पडलो तेव्हा मी सांगितले होते की, माझा वाद हा विठ्ठलासोबत नसून त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांसोबत आहे आणि ही चार टाळकी पक्षाला खड्ड्यात घालणार आहेत. म्हणून त्या पापाचा मला वाटेकरी व्हायचे नव्हते म्हणून शिवसेना सोडली, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. नारायण राणांसारख्या नेत्यांना पक्षातून बाहेर काढण्याचे काम सुरू होते. आणि आज त्याचा असा शेवट झाला आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
हिंदुत्वाबद्दल काय म्हणाले राज ठाकरे? : राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेत पुढे सांगितले की, मला काल एका मुलाखती दरम्यान विचारले गेले होते की, तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय? अन् आजच हिंदू नववर्ष. मला माझ्या हिंदुत्वात धर्मांध हिंदुत्व नको. धर्माभिमानी हिंदू मला हवा आहे. जो इतर धर्मांचाही सन्मान राखेल. मला मुस्लिम धर्मातीलही माणसे पाहिजेत. मला जावेद अख्तरांसारखी पण माणसे हवी आहेत. जावेद अख्तरांनी पाकिस्तानात जावून खडेबोल सुनावले. द्वेषाने बघण्यासारखे नसते. पण ज्या ठिकाणी कुरापती काढल्या जातात त्या ठिकाणी त्याच पद्धतीने उत्तर द्यायला हवा. मला अपेक्षित असलेला मुसलमान पाकिस्तानला खडेबोल सुनावणारा हवा आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.