मुंबई- कांजूरमार्ग परिसरातील ६० फूट रोडवर दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्याच पावसात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचे निषेध करण्यासाठी आज मनसे विक्रोळी विधानसभा तर्फे खड्डेग्रस्त रस्त्यात खेकडे सोडून अनोखे आंदोलन करण्यात आले.
नुकतेच चिपळून येथील तीवरे धरण खेकड्यांनी फोडले, असे एका मंत्र्याच्या अजब उत्तराने राजकारण ढवळून निघाले होते. या दुर्घटनेत २० नागरिकांचा जीव गेला होता. त्यातच आता मनसेनेसुद्धा खेकड्यांचा वापर करून पालिकेचा विरोध केला आहे. कांजूरमार्ग येथील आंदोलनात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका, रस्ते कॉन्ट्रॅक्टर व प्रशासनाचा निषेध करण्यासाठी खेकड्यांच्या पाठीवर नावे लिहिली व ते खेकडे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये सोडले. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी मनसे विक्रोळी विधानसभा तर्फे खड्ड्याचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यावेळी पालिका प्रशासनाने वेळीच या आंदोलनाची दखल घेऊन रस्त्याची डागडुजी केली होती.
पण मुंबईत काही दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे पुन्हा तेच खड्डे रोडवर दिसल्यामुळे मनसेतर्फे आज पुन्हा त्याच पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे विधानसभा अध्यक्ष विनोद शिंदे यांनी पालिका प्रशासनला लवकरात लवकर खड्डे बुजवा अन्यथा मनसेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येइल, असा ईशारा दिला आहे.