मुंबई - मुंबईतील सर्वात मोठे असलेल्या बीकेसी जम्बो कोविड सेंटरवर मनसेने गंभीर आरोप केले होते. याबाबत बीकेसी कोविड सेंटरची परिस्थिती १ आठवड्यात सुधारली नाही तर मनसे स्टाइल आंदोलन करू, असा इशारा सरकार आणि पालिकेला दिला होता. आज मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्त्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने बीकेसीचे प्रमुख राजेश ढेरे यांची भेट घेतली. यावेळे संदीप देशपांडे आणि बीकेसी प्रशासन यांच्यात बाचाबाचीही झाली असल्याचे बोलले जात आहे.
'बीकेसीमध्ये उपचार रामभरोसे'
'बीकेसीमध्ये अनुभवी डॉक्टरांची कमतरता आहे. या ठिकाणी उपचार रामभरोसे चालले आहेत, असा आरोप मनसेकडून मागच्या आठवड्यात करण्यात आला होता. एक आठवड्याचा अवधी आम्ही सेंटरला देत आहोत. त्यांनी लवकरात लवकर उत्तर द्यावे', अशी भूमिका मनसेने घेतली होती. परंतु बीकेसी सेंटरकडून कोणतेही उत्तर न आल्याने आज मनसे आक्रमक झाली. त्यांनी बीकेसी कोविड सेंटरला भेट दिली.
'बोगस कंत्राटदारांवरही कारवाई करा'
'आम्ही एक आठवड्यापूर्वीच इशारा दिला होता. आज आमचे शिष्टमंडळ बीकेसी कोविड सेंटरला भेटायला गेले होते. यावेळी आम्ही बीकेसीचे डीन यांची भेट घेतली. यावेळी त्यांना आम्ही जाब विचारला. त्यांनीदेखील कोविड सेंटरमध्ये अनेक गोष्टी अपुऱ्या असल्याचे मान्य केले आहे. त्या गोष्टी 10 दिवसात पूर्ण करा, असे सांगितले आहे. आम्हाला आशा आहे की ते 10 दिवसात या गोष्टी पूर्ण करतील. रुग्णाचा जीव हा महत्त्वाचा आहे. तसेच बोगस कंत्राटदारांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे', असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले.
हेही वाचा - ड्रग पेडलर हरीश खानला एनसीबीकडून अटक