मुंबई - आज सत्तेसाठी सर्व चाललेले आहे. मात्र, आम्हाला सत्ता नको आणि पदही नको आहे. आमच्याकडे राजनिष्ठा हीच महत्त्वाचे पद आहे तेवढेच पुरे, असे म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. आज (गुरुवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते.
मनसे नेते नांदगावकर पुढे म्हणाले, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या 13 वर्षात अनेकांना मोठे केले. प्रतिष्ठा दिली. मात्र तीच माणसे बेईमान का होतात, अशी टीका मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्यांवर नाव न घेता केली. एवढेच नाही तर ज्याला ज्याला साहेबांनी मोठे केले, तो साहेबांवर टीका करून जातो, हे मला अजूनही कळू शकलेले नाही, असे देखील नांदगावकर म्हणाले.
हेही वाचा - 'समाजात फूट पाडणाऱ्या भाजपबद्दल विचार करावाच लागेल'
मनसेच्या महाअधिवेशनादरम्यान बाळा नांदगावकर यांनी आपल्या भाषणात मनसेची साथ सोडलेल्या नेत्यांवर टीका केली. तसेच सुरुवातीला आपल्या 13 आमदारांनी ग्रामीण भाग पिंजून काढला असता तर, आज मनसेचे नवनिर्माण झाले असते, असेही ते म्हणाले. दरम्यान, यावेळी कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे, असे सांगत आता हा नव निर्माणाचा झेंडा फडकवूया, असे आवाहनही नांदगावकर यांनी केले.