मुंबई - मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी शुक्रवारी (16 जुलै) शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिरोडकर यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते.
मनसेला धक्का
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केलेली आहे. मागील काही महिन्यात शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. मनसेकडून दररोज शिवसेनेवर जोरदार टीका होत असते. मात्र याद्वारे शिवसेनेने मनसेला जोरदार उत्तर दिले आहे. यामुळे मनसेला धक्का बसला आहे.
मनसेमध्येही शिरोडकरांकडे मोठी जबाबदारी
महाराष्ट्र निर्माण सेनेने देखील काही दिवसापूर्वी पुन्हा जोरदार पक्षबांधणीला सुरुवात केली होती. यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय पथक तयार करण्यात आलं. यात एक मनसे नेता आणि सरचिटणीस असा समावेश करण्यात आला होता. यात मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी आदित्य शिरोडकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. मनसेने तयार केलेल्या शेडो कॅबिनेटमध्ये देखील शिरोडकर यांना उच्च शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली होती.
म्हणून मनसेही शिरोडकरांवर होती नाराज
आदित्य यांचे वडिल राजन शिरोडकर हे राज ठाकरे यांचे जवळचे मित्र होते. तसेच त्यांचे व्यवसायिक संबंधही होते. मित्राचा मुलगा या नात्याने आदित्य देखील राज यांच्या जवळचे होते. भारतीय विद्यार्थी सेना ज्याप्रकारे वाढली पाहिजे होती, त्याप्रकारे प्रगती झाली नव्हती. त्यामुळे मनसे त्यांच्याबद्दल नाराजी होती. तसेच ते पक्षात जास्त सक्रिय देखील नव्हते. त्यांनी अखेर मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेत येताच मोठी जबाबदारी
आदित्य शिरोडकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील त्यांचे शिवसेना परिवारात स्वागत केले आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे म्हणत आदित्य यांनी शिरोडकरांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय, शिवसेनेत येताच उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी शिरोडकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
हेही वाचा - लॉकडाऊन : जनजीवन सुरळीत न झाल्यास लोकं वेडे होतील; चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली भीती