मुंबई - मागील 2 ते 3 वर्षापासून राज्यातील राजकारण खूप खराब पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे मनाला वेदना होत आहेत. शिवसेनेसोबत जे काही सुरू आहे त्यावर देखील मनात वेदना होत आहेत. धनुष्यबाण हे फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच झेपू शकते. धनुष्यबाण एकाला झेपले नाही, आता दुसऱ्याला झेपेल का नाही हे माहिती नाही, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
भोंगा मुद्द्यावर राज ठाकरे आक्रमक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता तुमच्याकडे शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह आले आहे. मागील गुढीपाडव्याला आम्ही मशिदीवरील भोंगे बंद करा असे सांगितले होते. त्यावेळी महाविकास आघाडी सरकार होते. भोंग्यांवरून मागील सरकारने माझ्या 17 हजार महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केले होते. ते गुन्हे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागे घ्यावेत. तसेच येत्या एका महिन्यात सुरू असलेले मशिदीवरी भोंगे तुम्ही सांगून बंद करा नाहीतर आमच्याकडे दुर्लक्ष करा, असा इशाराच राज ठाकरे यांनी भोंगा मुद्द्यारून राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे या दोनपैकी एक निर्णय शिंदे सरकारला घ्यावा लागेल. मी भोंग्याचा विषय सोडला नाही व सोडणारही नाही. त्याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्गाचे बांधकाम - गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी एक व्हिडिओ दाखवत मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला. मुंबईतील माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्गाचे बांधकाम सुरू असल्याचा दावा राज ठाकरे यांनी याद्वारे केला आहे. हे अनधिकृत बांधकाम एका महिन्यात न पाडल्यास त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभे करू, असा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता पुन्हा नवीन वादाला तोंड फुटणार आहे.
कोरोनात आमदारांनासुद्धा भेटले नाहीत उद्धव ठाकरे - राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून अनेकांवर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या बंडखोरीवरही राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. बंडखोर आमदारांचा उल्लेख राज ठाकरे यांनी अलिबाबा आणि त्याचे चाळीसजण असा केला आहे. राज ठाकरे म्हणाले, अलिबाबा आणि त्यांचे चाळीसजण सुरतला गेले. त्यांना चोर म्हणता येणार नाही कारण ते चोर नाहीत. उद्धव ठाकरे यांनाच कंटाळून त्यांनी शिवसेना सोडली. कोरोना काळात उद्धव ठाकरे कुणालाच भेटायला तयार नव्हते. एक आमदार आपल्या मुलाला घेऊन उद्धव ठाकरे यांना भेटायला आला होतात. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्याच्या मुलाला बाहेर ठेवले आणि आमदाराला भेट दिली.
महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेले - राज ठाकरे म्हणाले की, आजपर्यंत मला एवढेच माहिती होते की छत्रपती शिवाजी महाराज सुरतहून लूट करून महाराष्ट्रात आले होते. आता महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले एकनाथ शिंदे पहिलेच आहेत. त्यानंतर गुवाहाटी आणि गोवा असा प्रवास करत शिंदे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रासाठी एकनाथ शिंदे यांनी काम केले पाहिजे. उद्धव ठाकरे जिथे सभा घेतात तिथे उत्तर द्यायला सभा घेऊ नका, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.