मुंबई - गेले अडीच महिने लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारचे वाहतूक व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाकडून या चालकांना मदत मिळावी व यांचा आक्रोश सरकारला ऐकू जावा, यासाठी मनसे वाहतूक कामगार सेना शुक्रवारी (12 जून) सायंकाळी 5 वाजता 1 मिनिटे ‘हॉर्न वाजवा' आंदोलन करणार आहे.
लॉकडाऊनमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे उत्पन्न बुडाल्यामुळे त्यांना शासनाने मदत करावी, यासाठी मनसे वाहतूक सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. मात्र, अद्याप कोणत्याही मंत्र्यांनी याची दखल घेतली नाही. अनलॉक 1.0 अंतर्गत चारचाकी वाहनांना अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी देण्यात आली. मात्र, त्याचा वापर ओला आणि उबेर सारख्या खासगी वाहतूक कंपन्याचे चालक हे प्रवासी वाहतुकीसाठी करतात. त्यात रिक्षा टॅक्सी चालकांनी प्रवासी वाहतूक नेल्यास वाहतूक पोलीस त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतात.
राज्य सरकारचे परिवहन विभाग दुजभाव करत असून, परिवहन मंत्र्यांना कोणत्याच संघटनेला भेटण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे सरकारपर्यंत रिक्षा टॅक्सी चालकांचा आवाज पोहोचवण्यासाठी 1 मिनिटे हॉर्न वाजवा आंदोलन पुकारल्याचे मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी सांगितले.