मुंबई - गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व बाहेरून आलेल्या फेरीवाल्यांमुळे सामान्य नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मुजोर फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, यासाठी मनसेच्या वतीने दादर येथील पालिकेच्या जी-उत्तर कार्यालयात मोर्चा काढला.
दादरमध्ये काही दिवसापूर्वी ह्दय हेलवणारी घटना घडली होती. फक्त 10 रुपयांच्या वादातून भाजी विक्रेत्याने एका ग्राहकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेनंतर फेरीवाल्यांविरोधात आक्रमक असणारी मनसेने विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या जी-उत्तर कार्यालावर धडक देत मुजोर फेरीवाल्यांवर कडक कारवाईची मागणी केली.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परप्रांतीय फेरीवाले रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर क्षेत्राच्या आत बिनधास्त बसत आहेत. नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मनसेने पालिका प्रशासन व पोलिसांना दिले.
युपी, बिहारी व बांगलादेशी परप्रांतीय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांमध्ये गेल्या ५ वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे. खून करण्याइतपत त्यांची मजल जाते. ही मुगरूमी त्यांच्यात आली कुठून, पोलिसांची भीती त्यांना राहिलेली नाही का? याकडे पालिका प्रशासन व पोलिसांनी गांभीर्याने पहिले पाहिजे असा प्रश्न ही यावेळी मनसेकडून उपस्थित करण्यात आला.
येत्या 15 दिवसांत अशा फेरीवाल्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. कारवाई झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल असे आश्वासन जी/उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी दिले असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.