मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १३ व्या वर्धापनदिनी राज ठाकरेंनी मोदी सरकारवर तुफान फटकेबाजी केली. यातून त्यांनी त्यांचा भाजप आणि मोदी विरोध अधोरेखीत केला. पण, मनसे लोकसभा निवडणूक लढणार की नाही. लढली तर कुणाकडून आणि किती जागा लढवणार याची उत्सुकता घेऊन कार्यकर्ते सभेला गेले होते. मात्र, ही भूमिका अस्पष्ट ठेवून ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास केल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. कुठल्याही क्षणी निवडणुकीच्या तारखा घोषीत होऊ शकतात. पण, राज ठाकरेंच्या पक्षाची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभेसाठी त्यांनी कल्याण मतदारसंघाची मागणी केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून मात्र कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असे बोलले जात आहे. पण, जागेबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे ठाकरे काल म्हणाले.
राष्ट्रवादी, काँग्रेस स्पष्ट काही सांगत नाहीत. भाजपच्या विरोधाची भूमिका घेतल्याने त्यांच्याकडे जाणे शक्य नाही, अशा पेचात राज ठाकरे सध्या आहेत. त्यामुळे ते एकला चलोचा नारा देतील अशी आशा कार्यकर्त्यांना होती. मात्र, त्यांच्या भाषणातून कोणताच ठोस कार्यक्रम हाती न आल्यामुळे कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका करुन या निवडणुकीत आपला शत्रु कोण असणार हे मात्र ठाकरेंनी स्पष्ट केले. पण, त्यांचा मित्र कोण असणार हे ते सांगू शकले नाहीत.