मुंबई - दरवर्षीप्रमाणे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पावसाळ्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. एमएमआरडीए प्रकल्पाच्या ठिकाणी ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी या कक्षाच्या माध्यमातून सोडवल्या जाणार आहेत.
हा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार असून 15 जून ते 15 ऑक्टोबरदरम्यान सुरू राहणार आहे. हा कक्ष राज्य सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका यासारख्या विविध आपत्ती नियंत्रण संस्थांशी जोडलेला असणार आहे. त्यामुळे एखादी तक्रार आल्यानंतर संबंधित यंत्रणांना तत्काळ माहिती देऊन तिचे निवारण केले जाणार आहे. सकाळी ७ ते दुपारी ३, दुपारी ३ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ अशा तीन शिफ्टसह नियंत्रण कक्ष २४ तास चालू राहणार आहे.
या नियंत्रण कक्षात रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत पुरुष कर्मचारी असणार तर सकाळी ७ ते दुपारी ३ यावेळेत महिला कर्मचारी कार्यरत असणार आहेत. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुसर्या दिवशी एक दिवसाची सूट देण्यात येणार आहे.
022-26591241, इंटरकॉम- 022-26594176, मोबाईल +91-8657402090 या क्रमांकावर नागरिकांना आपली तक्रार नोंदवता येणार आहे. पावसाळ्यात मेट्रो साईट किंवा इतर प्रकल्पात पाणी साचू नये याची पूर्ण काळजी घेतली जात असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे.