मुंबई - कोरोनानंतर दैनंदिन व्यवहारांमध्ये अनेक बदल झाले आहेत. असाच एक बदल आता मेट्रो-1 (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) प्रकल्पातही होणार आहे. मेट्रोतून प्रवास करण्यासाठी आवश्यक असणारे प्लास्टिक टोकन आता कायमचे हद्दपार करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)ने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जेव्हा-केव्हा मेट्रो-1 सुरू होईल तेव्हा टोकनचे काम कागदी तिकीट किंवा मोबाईल करणार आहे.
मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल तीन महिन्यांनंतर ट्रॅकवर आली आहे. त्यामुळे आता मुंबईची नवीन लाईफलाईन म्हणजेच मेट्रो-1 कधी सुरू होणार याकडे अनेक प्रवाशांचे लक्ष लागले आहे. एमएमओपीएलला सज्ज असून ते केवळ सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहे, अशी माहिती एमएमओपीएल प्रशासनाने दिली आहे. मात्र, जेव्हा-केव्हा मेट्रो 1 सुरू होईल तेव्हा त्यात अनेक बदल झालेले प्रवाशांना अनुभवता येणार आहेत. आता मेट्रोतून एकावेळी केवळ 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. फिजिकल डिस्टन्ससाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन प्रवाशांमध्ये एक सीट रिकामी असेल. प्रत्येक प्रवाशाचे थर्मल स्क्रिनिंग होईल. स्थानक आणि गाड्यांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्यात येईल.
दरम्यान, मेट्रो स्थानकावरून मेट्रो गाडीत जाण्यासाठी प्लास्टिक टोकनचा तिकीट म्हणून वापर होत असे. स्मार्ट कार्ड वा मोबाईल तिकीट न वापरणाऱ्यांसाठी टोकनचा पर्याय होता. टोकन वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्लास्टिक टोकन एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे जाते त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे टोकन कायमचे बाद करण्यात आले आहे. आता प्रवाशांना मोबाईल आणि कागदी तिकीटाचा पर्याय असणार आहे. मोबाईलवरील आणि कागदी तिकिटावरील क्युआर कोड एएफसी गेटवर स्कॅन केल्यास गेट उघडून मेट्रो प्रवास आता करता येणार आहे.