मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पहिल्या मजल्यावर सुसज्ज आणि सोयी सुविधायुक्त असे, हिरकणी कक्ष सुरु करण्यात आले. सभापती नीलम गोऱ्हे यांनी कक्षाची आज पाहणी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार सरोज अहिर यांनी विधान भवनातील हिरकणी कक्षबाबत आक्षेप नोंदवला होता.
राज्यात अशाच सुविधा व्हाव्यात: याबाबत बोलताना सरोज अहिरे म्हणाल्या की, काल माझ्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते. पण राज्यातील इतर जे हिरकणी कक्ष आहेत किंवा जे निर्माण करण्याची गरज आहे. याबाबत माझा पाठपुरावा सतत राहील. राज्यात सर्व ठिकाणी अशा पद्धतीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. आज विधिमंडळाच्या हिरकणी कक्षात बाळाला मांडीवर घेऊन स्तनपान करण्यासाठी पलंग, पाळणा या व्यवस्था केल्या आहेत.
अधिवेशनात मुद्दा उपस्थित: विधीमंडळात बाळ संगोपनाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील कक्षात सोयी सुविधांचा अभाव आहे. बाळाला ठेवण्यासाठी सोय नाही, अशी तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आमदार सरोज अहिर यांनी केली होती. विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. दरम्यान, सभापती गोऱ्हे यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याशी संपर्क साधून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यासाठी सूचित केले.
उपसभापतींनी केली पाहणी: राज्य शासनाने याची दखल घेत हिरकणी कक्षात आवश्यक त्या सोयी - सुविधा, पाळणाघर आदी सोय उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विधान भवनाच्या पहिल्या मजल्यावर या अद्ययावत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. सभापती गोऱ्हे यांनी कक्षाची आज पाहणी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यावेळी उपस्थित होते. विधिमंडळातील पूर्वीच्या नियमांत बदल केला आहे. अटी - शर्ती, नियम समितीच्या माध्यमातून प्रसूतीसाठी महिला आमदारांना तीन महिन्यांची रजा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. आमदार अहिरे यांनी गोऱ्हे आणि शासनाच्या कर्मचारी - अधिकाऱ्यांचे आभार मानले. राज्यात सर्वत्र अशी सुविधा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
निर्वाणीचा दिला होता इशारा: आपल्या नवजात बाळाला घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी आलेल्या आमदार सरोज अहिरे यांनी सरकारला आता निर्वाणीचा इशारा दिला होता. हिरकणी कक्षाची अधिवेशनात केलेली स्थापना अत्यंत गैरसोयीची असून सरकारने महिलांची थट्टा केली आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे या अधिवेशनातून निघून जाण्याचा इशारा आमदार सरोज अहिरे यांनी दिला होता. त्या याबाबत पुढे म्हणाल्या की, मी आई व त्यासोबत एका मतदार संघाची आमदारही आहे. म्हणून माझ्यासाठी मातृत्व व कर्तृत्व या दोन्ही जबाबदाऱ्या महत्त्वाच्या असल्यानं मी बाळाशिवाय सुद्धा राहू शकत नाही. सरकारने या प्रश्न गांभीर्याने विचार करून व्यवस्था करायला हवी, असे आमदार सरोज अहिरे म्हणाल्या होत्या. यानंतर सरकारने तत्काळ दखल घेत हिरकणी कक्ष अद्यावत केला आहे.