मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधाना केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी केलेल्या घोषणाबाजीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची कबर खोदली जाईल, असे वक्तव्य करण्यात आले. काँग्रेस नेत्यांच्या या वक्तव्याचा भाजपतर्फे तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. याबाबत भाजप प्रवक्ते तथा आमदार राम कदम यांनी काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका केली आहे.
कॉंग्रेसवर जोरदार टीका: काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत वापरलेल्या आक्षेपार्ह विधानावरून बोलताना राम कदम म्हणाले की, काँग्रेस नेते भ्रमित झाले आहेत. त्यांचा जळफाट दिसून येत आहे. त्यांचा अहंकार उफाळून चालला आहे. त्यांनी सर्व मर्यादा तोडून दिल्या आहेत. त्यांचे नेते सांगत आहेत की, आदरणीय मोदीजी यांची कबर खोदली जाईल. काय अर्थ होतो याचा. ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारू इच्छितात? काँग्रेसचे नेते जे बोलताहेत त्याचा काय अर्थ होतो? एक असे प्रधानमंत्री जे आपले संपूर्ण आयुष्य त्याग करून भारत मातेचे पूर्व वैभव प्राप्त होण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत.
काँग्रेसला दुःख का आहे?: आमदार राम कदम म्हणाले की, पंतप्रधानांच्या कार्यामुळे काँग्रेसला यावर आपती आहे. फक्त देशाने नाही तर संपूर्ण जगाने त्यांना विश्वाचा नेता म्हणून स्वीकारले आहे. याचे काँग्रेसला दुःख आहे. की संपूर्ण देशाने काँग्रेसला नाकारले आहे. त्यांचे दुकान आता बंद होत आहे. म्हणून काँग्रेसचे नेते अशा पद्धतीची भाषा बोलत आहेत. ते सुद्धा देशाच्या पंतप्रधानाबद्दल काँग्रेसचे नेते असे बोलत आहेत. देशाचेच नाहीत तर जगातले करोडो लोक मोदीजी यांच्या सोबत आहेत. ते ईश्वरी महापुरुष आहेत. करोडो लोकांची प्रार्थना त्यांच्यासोबत आहे. काँग्रेस नेत्यांच्या या वक्तव्याला उत्तर देशाची जनता दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही राम कदम म्हणाले.
राजकारणी लोकांचे घाणेरडे राजकारण: दुसरीकडे औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यानी शिंदे - फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यावर बोलताना राम कदम म्हणाले की, आम्ही सर्व जातीधर्माचा सन्मान करतो. परंतु कोणी परकीय भारताच्या या भूमीवर येऊन लाखो लोकांना त्रास देतो, त्यांचा छळ करतो, मंदिरे तोडतो, लोकांवर अन्याय करतो, अशा व्यक्तीचा जयजयकार या भूमीत कसा होऊ शकतो? आज छत्रपती संभाजीराजे यांचे नाव ठेवले गेले आहे. ते वीर, साहसी योद्धा होते. हे नाव ठेवल्यानंतर काही राजकारणी लोक याबाबत घाणेरडे राजकारण करत आहेत. या विषयावर ते आपल्या पक्षाची दुकानदारी करत आहेत, असा आरोपही राम कदम यांनी केला आहे.