मुंबई - हैदराबादच्या हुसेन सागरमध्ये १२५ फुटांचा भगवान बुद्धांचा पुतळा आहे. याच धर्तीवर पवई तलावात भगवान बुद्धांचा पुतळा उभारावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे केली आहे. मुंबईच्या चांदीवली मतदारसंघातील नागरिकांच्या विविध प्रश्नाबाबत नसीम खान यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खान म्हणाले, येथील स्थानिक नागरिक सतत हैद्राबादच्या हुसेन सागर तलावात असलेल्या भगवान बुद्धांच्या पुतळ्याप्रमाणे पुतळा उभारण्याची मागणी करत आहेत. भगवान बुद्धांचा पुतळा उभारल्यास पवई तलावाकडे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. पवई तलावाला लागूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे. या उद्यानात स्थानिक रहिवाशांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याला पालिकेने त्वरित ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी खान यांनी केली. साकीनाका येथील झुंजार क्रीडा मैदानात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकुर्ती पुतळा उभारण्यासाठी मान्यता देण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी कुर्ला बैलबाजार ते साकीनाका, कुर्ला अंधेरी रोड आणि बैलबाजार ते अशोक लेलंड मगन नथुराम रोड या दोन अर्धवट राहिलेल्या रस्ता रुंदीकरण प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली. यासोबतच पावसाळ्यापूर्वी मिठी नदी आणि नाल्याची साफसफाई, विविध ठिकाणी होत असलेली पाणी टंचाई दूर करण्याची मागणी करण्यात आल्याचेही खान यांनी सांगितले. तसेच साकीनाका ते पवई येथील तानसा पाईपलाईन रुंदीकरणात बाधित राहिवाशांची सुनावणी होऊनसुद्धा अद्याप त्यांचे पुनर्वसन झाले नसल्याने त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्याची मागणी करीत मतदार संघातील अंदाजे २० रस्त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याची मागणी केली. यावर पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी नसीम खान यांना सर्व काम पूर्ण होण्याचे आश्वासन दिले आणि संबधित अधिकाऱ्यांना सर्व कामे वेळीच करण्याचे निर्देश दिले आहेत.
बिल्डरवर कारवाई करा -
मोहिली व्हिलेज साकीनाका येथे मागील ४०-५० वर्षापासून राहत असलेल्या १४ सोसायटी मधील अंदाजे ८०० कुटूंबाची घरे पालिकेद्वारे तोडण्याची दहशत संचेती बिल्डरकडून निर्माण केली जात आहे. दहशत निर्माण करणारा बिल्डर आणि त्यांना साथ देणाऱ्या भ्रष्ट पालिका अधिकाऱ्यावर कार्यवाहीची मागणीसुद्धा नसीम खान यांनी केली.