मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आदिवासी विभागावर भ्रष्ट्राचाराचा आरोप केला आहे. त्यांनी विभागात फर्निचर घोटाळा झाला असल्याचे सांगितले. यामध्ये १०० कोटींचा घोळ असल्याचा आरोप आव्हाडांनी विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केला.
आदिवासी विभागामार्फत फर्निचर घोटाळा करण्यात आला आहे. यात कंत्राटदार ठरवून नेमण्यात आले. निविदाबाबत कोणतेच नियम पाळले गेले नाहीत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे दर लावले गेले. महाग कंत्राटदाराला हे काम दिले गेले, ही निविदाप्रक्रिया संशयास्पद आहे, अशी घोटाळा करणारी एक टोळी या महाराष्ट्रात कार्यरत आहे. या टोळीच्या सरदार कोण याचा शोध सरकारने घ्यावा ज्याने १०० कोटी घशात घातले, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केली.
१ ऑगस्टपासून अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. या शताब्दी वर्षी त्यांचे साहित्य घराघरात पोहोचवावे याची व्यवस्था करावी, अशी विनंती आहे. त्यांचे घाटकोपर येथील घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे. बोदेगाव येथील जमिनीवरही स्मारक बनवावे अशी मागणी आहे, असे आव्हाड म्हणाले.
पश्चिम मुलुंड येथील जमीन विलास पाटील या अधिकाऱ्याचा मुलगा अमर पाटील आणि दरगर विकासकाने घशात घातली. या प्रकरणात खोटी कागदपत्रे दाखल करून फेरफार करण्यात आली. या प्रकरणाची कसून चौकशी व्हायला हवी आणि लाचलुचपतीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली.
विश्वास पाटील आणि हिदमत उडान यांनी 'हॉलिडे इन' या हॉटेलच्या बाजूच्या झोपडपट्टीचा विकास केला आणि सदनिका बळकावल्या. सिताराम कुंटे कमिटीने यांना दोषी ठरवले मात्र, अजूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असे आव्हाड म्हणाले.