नवी मुंबई - एकीकडे नवी मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे, तर दुसरीकडे प्रशासनाकडून सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनाचा घाट घातला जात आहे, असा आरोप भाजप आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. त्यांनी या विषयावरुन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना जाब विचारला आहे.
आमदार गणेश नाईक यांनी वाशी येथील कोविड हेल्थ सेंटर भेट दिली. तेव्हा त्यांना सेंटरच्या उद्घाटनासाठी मांडलेल्या खुर्चा तसेच उद्घाटनाची तयारी दिसून आली. यामुळे आमदार नाईक यांना संताप अनावर झाला. त्यांनी कॅमेऱ्यासमोर आयुक्तांशी फोनवर संभाषण केले. यावेळी ते आयुक्तांवर भडकले. त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
मुंबईतील रुग्ण संख्या वाढत असताना, उद्घाटन करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात नाईक यांनी समाचार घेतला. दरम्यान, महापालिकेच्या माध्यमातून सिडको एक्झिबिशनमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाची १२०० खाटांची क्षमता आहे. त्यापैकी ५०० खाटा ऑक्सिजन तर उर्वरित जनरल रुग्णांसाठी असणार आहेत. सध्या या रुग्णालयात तीव्र स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जाणार नाहीत. १० एप्रिल २०२० रोजी या रुग्णालयाचे काम सुरू करण्यात आले होते. अवघ्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
हेही वाचा - पावसाळी आजार रोखण्यासाठी सुट्टीच्या दिवशी वैद्यकीय शिबिरे आयोजित करा - आयुक्त इक्बाल सिंह चहल
हेही वाचा - पावसाळ्यात कोरोना विषाणूचा धोका सर्वाधिक- आयआयटीतील प्राध्यापकांचे निष्कर्ष