मुंबई : MLA Disqualification Case : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरण्याबाबतचा निर्णय देण्यासाठी एका आठवड्याची कालमर्यादा सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली. या सर्व घडामोडींवर राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी दिल्लीत जाऊन घटनातज्ञांशी याबाबत चर्चा केली. त्याचबरोबर आज मुंबईमध्ये बोलताना पुढील आठवड्यात याबाबत सुनावणी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
कायद्यामध्ये वेळोवेळी काही बदल : आमदार अपात्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारल्यानंतर या विषयाला आता गती आली आहे. याच कारणानं गुरुवारी राहुल नार्वेकर यांनी तातडीनं दिल्ली दौरा करत याबाबत महाधिवक्ता तुषार मेहता यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर इतर घटनातज्ञांशीसुद्धा त्यांनी चर्चा केली असल्याचं सांगितलं आहे. याबाबत बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, कायदेतज्ञांसोबत दिल्लीत भेटीगाठी झाल्या. आदरणीय सर्वोच्च न्यायालयानं एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्यासंदर्भामध्ये निर्णय दिले आहेत. त्यांच्या निर्णयाचं पालन केलं जाईल. पुढील आठवड्यात आम्ही सुनावणी घेऊ. निलंबनाबाबत कायद्यामध्ये वेळोवेळी काही बदलही झाले आहेत, होत असतात त्याची माहिती घेतली जात आहे.
पुढील आठवड्यात सुनावणी : सर्वोच्च न्यायालयानं जी काही ऑर्डर दिली आहे, त्याबाबत चर्चा सुरू आहे. पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याचं मी यापूर्वीच ठरवलं होतं. त्यात आता सर्वोच्च न्यायालयानंसुद्धा तसे आदेश दिले आहेत. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणात मीच न्यायधीश असल्याकारणानं व हे संपूर्ण प्रकरण न्यायिक असल्याकारणानं यावर जास्त भाष्य करणं उचित होणार नाही, असेही नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून अर्ज नाही : आमदार अपात्र संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं कडक शब्दात राहुल नार्वेकर यांना समज दिल्यानंतर या प्रकरणाला गती आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व शिवसेना एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांना विधानसभा अध्यक्ष यांच्या कार्यालयाकडून नोटीसा पाठविल्या जाणार आहेत. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ सचिवालयातील अधिकारी त्याचबरोबर काल दिल्लीतही महाधिवक्ता तुषार मेहता तसेच इतर कायदेतज्ञांची या विविध मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर त्यातून काही नवीन मुद्दे उपस्थित होतात का? याचाही आढावा घेतला आहे. त्याचबरोबर आता आमदार अपात्रतेसंदर्भात पुढील सुनावणी तीन ऑक्टोबरला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अजून कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून नवीन कुठलाही अर्ज अद्याप आपल्याकडं प्राप्त झाला नसल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा -