मुंबई - राज्यात महिलांवर बलात्कार, बळजबरी आणि खंडणीचे प्रकार वाढत आहेत. कोणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही. राजकारणातील अनेकांची अशा गुन्ह्यांमध्ये नावे आली आहेत. राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत आहे, अशा गुन्हेगारांना राज्य सरकार संरक्षण देत आहे, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर चढवला.
राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर बैठकीची माहिती देण्याची प्रथा आहे. त्यानुसार आज (दि. 6 फेब्रुवारी) राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे सर्व आमदार, सर्व खासदार यावेळी उपस्थित होते. बैठकीत दोन ठराव संमत झाले, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात गुन्हेगारी वाढली
महाराष्ट्रात बिघडत चाललेल्या स्थितीबाबत आशिष शेलार यांनी एक प्रस्ताव मांडला. यापूर्वी राजकारण होत होते. पण, गुन्हे दिसत नव्हते. मात्र, गेल्या दीड वर्षात राजकारणापेक्षा गुन्हेगारीत वाढलेली दिसते. अशा गुन्ह्यात राजकीय नेत्यांच्या आणि त्यांच्या जवळच्या लोकांचा संपर्क असून अनेक नावे उघड झाल्याची बाब केंद्रीय स्तरावरील बैठकीत मांडल्याचे पाटील यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही. नुकतेच ओबीसी आरक्षणबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत सरकारची दिरंगाई झाल्याचे दिसते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यात विकास आघाडी सत्तेवर आल्यापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यात भीतीचे वातावरण आहे. सरकारच्या या कारनाम्याची माहिती जनतेसमोर पोहोचविण्यासाठी राज्यभर आंदोलन केली जाणार आहेत, असा इशारा पाटील यांनी सरकारला दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात असला तरी आम्ही आंदोलन करू, असे पाटील म्हणाले.
वझेवर कारवाई करा
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या घराच्या परिसरातील स्फोटकांनी भरलेली मोटार सापडली होती. या मोटारीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला. सीआययू युनिटचे अधिकारी सचिन वझे या प्रकरणाशी जोडल्याचा आरोप करत कारवाईची मागणी चंद्रकांत पाटील यांनी परिषदेत केली.
हेही वाचा - मुकेश अंबानी प्रकरणाचा तपास सचिन वझे यांच्याकडे नाही - गृहमंत्री अनिल देशमुख
सरकारच्या कारनाम्याचा पर्दाफाश करणार
8 मार्चला महिला दिनाचे औचित्य साधून सुमारे 97 हजार बूथमध्ये सरकारचा निषेध केला जाणार आहे. महिला यावेळी काळ्या साड्या परिधान करतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक बुथवर बाबासाहेबांचा फोटो लावून 2 लाख मेणबत्ती पेटवत अभिवादन करण्याचे नियोजन असल्याचे पाटील म्हणाले. राज्यातील सुमारे 97 हजार बूथमध्ये कार्यक्रम घेणार असल्याचे पाटील म्हणाले.
महाराष्ट्र अन् मुंबई पोलीस जगात भारी
राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राजकीय आणि सत्ताधारी पक्षांच्या हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. महाराष्ट्र व मुंबई पोलिसांची कामगिरी जगात चांगली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच राज्य सरकारला केलेल्या पत्रव्यवहाराबाबत पुस्तक लिहावे लागेल, अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - 'मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विरोधीपक्षाने प्रश्न उपस्थित केले असतील, तर त्याचा तपास व्हायला हवा'
सोमवारी याचिका दाखल करणार
संजय राठोड यांच्यावर कारवाईसाठी भाजपला आंदोलन करावे लागले. चित्रा वाघ यांना अनेक पुरावे सादर करावे लागले. त्यानंतरही राजीनामा स्वीकारण्यास सरकारकडून टाळाटाळ सुरू होती. भाजपने दबाव टाकल्यानंतर हा राजीनामा स्वीकारण्यात आला. या प्रकरणात सोमवारी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - पोलीस आयुक्तांसोबत सचिन वझेंची 3 तास बैठक; नियमित बैठक असल्याची वझेंची माहिती