मुंबई : राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला हा वाद मिटवण्यासाठी रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांना समोरासमोर बसवून यांच्यासोबत चर्चा केली. हा वाद मिटविण्याचे प्रयत्न केले. तब्बल अडीच तास ही बैठक चालली.
मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी पण संभ्रम कायम? खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अपक्ष आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्या वादात उडी घेत काल त्यांच्या सरकारी वर्षा या निवस्थानी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते. रवी राणा आणि बच्चू कडू यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आमदार बच्चू कडू हे प्रचंड नाराज आहेत. आमदार रवी राणा यांनी केलेल्या आरोपांचे त्यांनी पुरावे द्यावे व त्यांनी सार्वजनिकपणे जाहीर माफी मागावी अशी मागणी या बैठकीत केली असल्याची माहिती आहे.
आज पत्रकार परिषदेत स्पष्ट करणार भूमिका? आज अपक्ष आमदार बच्चू कडू हे स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. तर दुसरीकडे या बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना आमदार रवी राणा यांनी फक्त हम साथ साथ है, असे म्हटले आहे. ते सुद्धा आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
कशावरून भडकले बच्चू कडू? आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. तर पैसे घेतल्याचे रवी राणा यांनी पुरावे द्यावेत अन्यथा त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करून असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. माझ्यासोबत १२ आमदार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. त्यामुळे आता खुद्द याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही आमदार बच्चू कडू यांची मनधरणी करण्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सफल झाले नसल्याने आता बच्चू कडू काय भूमिका घेतात याकडेच सर्वांचेच लक्ष लागले आहे.