मुंबई - शहरात जोरदार पाऊस झाला असून मागील २४ तासात पडलेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले होते. रस्त्यात पाणी भरल्याने बरीच वाहने बंद पडली होती. अनेक ठिकाणी ट्रॅफिकची मोठी समस्या निर्माण झाली होती. एका दिवसातच पावसाने मुंबईची दैना केली आहे.
बीएमसीमध्ये भ्रष्टाचार झाल्याने मुंबईत पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याला शिंदे सरकार जबाबदार आहे. शिंदे सरकारचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचाराचा चेहरा या पावसामुळे समोर आला आहे - आदित्य ठाकरे - ठाकरे गटाचे आमदार
आदित्य ठाकरेंची टीका - शनिवारी मान्सून मुंबईत दाखल झाला हे आपल्याला माहीत आहे. बीएमसीमध्ये भ्रष्टाचार झाल्याने मुंबईत पाणी साचले आहे, अशी टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली आहे. अंधेरीतील शिवाजी पार्क परिसरात पाणी साचले आहे. निर्लज्जपणा, नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचाराचा चेहरा असेल तर ते शिंदे सरकार आहे. मुंबईत इतका मोठा भ्रष्टाचार मी कधीच पाहिला नव्हता, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसेच त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
काल (शनिवारी एका तासामध्ये ७० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. तरी पाणी भरले नसल्याने सबवे सुरू होता. याचे कारण मिलन सब वेमध्ये बसविण्यात आलेली सिस्टम आहे. मी स्वतः आज ही सिस्टम कशा पद्धतीने काम करते, हे पाहण्यासाठी आलो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री रस्त्यावर - रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील कामाची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. वरळी कोस्टल रोड व अंधेरीतील मिलन सबवे येथे त्यांनी व्यक्तिशः भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामावर समाधान व्यक्त केले आहे.