मुंबई - मंत्रालयात असलेल्या मुख्य उपहारगृहातून कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या दालनात देण्यात येणाऱ्या खाद्य पदार्थांची लाखो रुपयांची बिले, त्यांची उधारी थकली आहे. ही उधारी आणि त्यांची बिले यांच्या रक्कमा संबधित मंत्री कार्यालयांकडून लवकर अदा करण्यात आले नाहीत, तर त्यांच्या दालनात देण्यात येणारी उधारी बंद केली जाणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या उपहारगृह विभागाने त्यासाठीचे एक फर्मान काढून मंत्रालयातील मंत्री कार्यालय, मुख्य सचिव, सहसचिव, उपसचिव आदी स्तरांवरील अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी चक्क एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार मंत्रालयातील प्रशासकीय विभागांना आपल्याकडे असलेल्या लाखों रुपयांची उधारी अगोदर अदा करावी लागणार आहे. तसे न केल्यास या मंत्रालयीन, सचिव आदी प्रशासकीय विभागाची उधारी बंद केली जाणार आहे.
लाखो रुपयांची उधारी विविध प्रशासकीय विभागांकडे थकली
मंत्रालयात रोज मंत्री आणि सचिव स्तरावरील विविध अधिकाऱ्यांच्या दालनात बैठका होत असतात. या बैठकांना उपस्थित असलेल्या अधिकारी, आदींना दररोज दिला जाणारा चहा, उपहार आणि इतर काही खाद्य पदार्थ यांची लाखो रुपयांची उधारी विविध प्रशासकीय विभागांकडे थकली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मंत्रालायतील उपहारगृह आणि त्यांच्या आर्थिक नियोजनावर होत असून त्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या उपहारगृह विभागाने हे पाऊल उचलले आहे. संबधीत कार्यालयांनी आपल्याकडे असलेली उधारी तातडीने जमा करावी, अन्यथा आम्हाला एक आठवड्यानंतर त्यांची उधारी बंद करावी लागेल, असे परिपत्रकात म्हटले आहे.